पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!
– संपादकीय बोर्डच्या ऑनलाईन बैठकीत एकमुखाने निर्णय; वस्तूनिष्ठ, सत्य आणि गॉसिपविरहीत बातम्या प्रसारित करणार!
मुंबई (प्रतिनिधी) – ‘मेन स्ट्रीम मीडिया’तून ऐन उमेदीच्या काळात ‘एक्झिट’ घेऊन भारताची लोकशाही, बहुधर्मिय- जातीय सलोखा, लोकशासन व्यवस्था व पत्रकारितेची मूल्ये जोपासण्यासाठी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल मीडिया’ची मुहूर्तमेढ रोवणारे धडाकेबाज पत्रकार व संपादकांनी आता लोकसभा निवडणुकीत कोणतीही पेड न्यूज न स्वीकारण्याचे व प्रसारित करण्याचे धोरण निश्चित केले आहे. पत्रकारिता विश्वात सगळीकडे निवडणूक पॅकेजचे आभाळ फाटले असताना, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय मंडळ आपल्यापरीने अशी पॅकेज नाकारून खारीचा वाटा उचलून ठीगळ लावण्याचे काम करणार आहे. ‘वस्तूनिष्ठ, सत्य आणि गॉसिपविरहीत बातम्या प्रसारित करून राज्यभरातील जवळपास १५ लाख वाचकांसाठी सत्य व वस्तूनिष्ठ रिपोर्टिंग करण्याचा निर्णय’ही आजच्या बैठकीत घेण्यात आला. संपादकीय मंडळाच्या या निर्णयाने अंदाजे ५० लाखाच्या आसपास निवडणूक बिझनेसवर पाणी सोडावे लागणार आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल मीडिया’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय बोर्डची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला हेमंत चौधरी (संपादक, पश्चिम महाराष्ट्र), प्राची कुलकर्णी (संपादक, मुंबई-कोकण), शिवाजीराव मुंडे (संपादक, मराठवाडा), प्रकाश कथले (संपादक, विदर्भ), संजय जोशी (सहसंपादक, पुणे), बाळू वानखेडे (सहसंपादक, विदर्भ), संकेतराज बने (सहसंपादक, पश्चिम महाराष्ट्र), आवेश तिवारी (सहसंपादक, नवी दिल्ली) यांच्यासह सरव्यवस्थापक हनुमंत बनकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती. संपादकीय बोर्डातील सर्वच सहकार्यांनी दोन ते तीन-साडेतीन दशके मेनस्ट्रीम मीडियात सर्वोच्च पदांवर काम केलेले आहे. पत्रकारितेतील जाहिरात बिझनेसच्या नावाखाली चालणार्या मालकवर्गाच्या ‘वसुलीगिरी’विरोधात दंड थोपाटून मूल्याधिष्ठीत पत्रकारिता करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल मीडिया’ची स्थापना केली आहे, व या निर्भीड, सडेतोड व वेगवान पत्रकारितेला मराठी वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. वाचकांचा हाच विश्वास जपण्यासाठी पेड न्यूज नाकारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
साधारणपणे राज्यभरात विविध उमेदवारांकडून अंदाजे ५० लाखांच्या घरात पॅकेजेस सहजच मिळू शकली असती. परंतु, ही पॅकेज स्वीकारली असती तर वाचकांचा मोठ्या कष्टाने, प्रामाणिक पत्रकारितेच्या जोरावर कमावलेला विश्वास गमवावा लागला असता. त्यामुळे मराठी वाचकांच्या विश्वासाला जपण्याची भूमिका घेत, पेड न्यूज व पॅकेज पत्रकारितेला ठोकर मारण्याचा निर्णय संपादकीय बोर्डने एकमताने घेतला. संपादकीय बोर्डातील संस्थापक संपादक तथा राज्यातील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चौधरी, संजय जोशी यांनी ही सूचना मांडली होती. या सूचनेला वरिष्ठ पत्रकार बाळू वानखेडे, प्राची कुलकर्णी, व सरव्यवस्थापक हनुमंत बनकर यांनी अनुमोदन दिले. ‘पैसा महत्वाचाच असला तरी, पत्रकारितेप्रती निष्ठा महत्वाची आहे’, त्यामुळे सर्वानुमते अखेर हा निर्णय मान्य करण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती राज्यभरातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सुमारे २०० पेक्षा अधिक पत्रकारांना लवकरच दिली जाणार आहे. पेड न्यूज व पॅकेज पत्रकारिता नाकारून वस्तूनिष्ठ, सत्य आणि गॉसिपविरहीत बातम्या, वार्तापत्रे प्रसारित करण्याचा निर्णय घेणारे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ हे पहिलेच डिजिटल मीडिया माध्यम ठरले आहे.
————