महायुती, महाआघाडीचे जागावाटप जवळपास फायनल; लवकरच उमेदवारांची घोषणा!
– योग्य जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी – आंबेडकर; वंचित बहुजन आघाडी अद्यापही महाआघाडीचा हिस्सा – संजय राऊत
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्यातील महायुती व महाआघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जवळपास निश्चित झालेले आहे. महायुतीच्या उमेदवारांची यादी २८ तारखेपर्यंत तर महाआघाडीच्या उमेदवारांची यादी उद्या-परवापर्यंत जाहीर होऊ शकते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवार यांना आजची डेडलाईन दिली होती. परंतु, शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या विनंतीनुसार, त्यांनी वंचितच्या जागांबाबत निर्णय कळविण्यासाठी उद्यापर्यंतचा (दि.२७) वेळ दिला आहे. आजची पत्रकार परिषददेखील आंबेडकरांनी तातडीने रद्द केली होती.दुसरीकडे, महायुतीचे जागावाटपदेखील जवळपास फायनल झाले असून, २८ तारखेला उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप २८ जागा, शिंदे गट १४, अजित पवार गट ५ तर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना एक जागा मिळू शकते. मनसेला एक जागा सोडली गेली तर ती शिंदे गट किंवा भाजपच्या कोट्यातून दिली जाणार आहे.
महायुतीच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाला रामटेक, बुलढाणा, वाशिम-यवतमाळ, हिंगोली, कोल्हापूर, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, मावळ, शिर्डी, पालघर, कल्याण, ठाणे, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर – पश्चिम मुंबई या जागा मिळाल्या असून, अजित पवार गटाला रायगड, बारामती, शिरूर, नाशिक व धाराशीव या जागा मिळाल्या आहेत. रासपचे महादेव जानकर हे परभणीतून लढणार आहेत. तर भारतीय जनता पक्ष नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, नंदूरबार, जळगाव, जालना, बीड, पुणे, धुळे, दिंडोरी, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, उत्तर मुंबई, रावेर व अहमदनगर या जागा लढणार आहे. यापैकी २३ जागांवरील उमेदवार भाजपने यापूर्वीच जाहीर केले असून, मुंबई उत्तर-मध्य, दक्षिण मुंबई, शिर्डी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सातारा या पाच जागांवरील उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांना शिर्डी किंवा दक्षिण मुंबई यापैकी एक जागा दिली जाणार आहे. राज ठाकरे यांनी यापैकी एक जागा निवडली तर ती भाजप किंवा शिंदे गटातून जाणार आहे.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स वाढविला आहे. आज ते आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता होती. तशी पत्रकार परिषददेखील त्यांनी बोलावली होती, पण ऐनवेळी ती रद्द करण्यात आली, व जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना एका दिवसाचा वेळ वाढवून दिला. दरम्यान, पवार व ठाकरे यांची मातोश्रीवर आज बैठक झाली, या बैठकीत वंचितला वाढीव जागा देण्याबाबतचा निर्णय झाला असून, तसा प्रस्ताव आंबेडकर यांना पाठविण्यात आला असल्याचे सूत्राने सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही अद्यापही महाविकास आघाडीचे घटक असून, त्यांच्याशी जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू आहे.
यासंदर्भात वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘वंचित’ची पुन्हा एक आज रात्री १० वाजता बैठक होणार आहे. आज रात्रीची ही अंतिम बैठक असणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकाससोबत जाणार का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे वंचित सोबत नसली तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितंल जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. ‘शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्या उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मविआत असल्यामुळे उद्या यादी जाहीर करू, असे ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवार निश्चित केलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तयारी झालीय. एकाही जागेवरून संघर्ष, तणाव नाही, असंही ते म्हणाले.
पेड न्यूज प्रसारित न करण्याचा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा निर्णय!