प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून जवळपास बाहेर; काँग्रेसलाच 7 जागांवर पाठिंबा जाहीर!
– उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चा अपयशी ठरल्याबद्दल केली नाराजी व्यक्त
– प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेनंतर राज्यात खळबळ!
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांना पत्र लिहित, राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांसाठी पाठिंबा देऊ केला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपातून काँग्रेसकडे आलेल्या कोणत्याही सात जागांवर वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष आणि धोरणात्मक पाठिंबा देईल, असे आंबेडकर यांनी या पत्रात नमूद केले आहे. याच पत्रात आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार या दोन्ही पक्षांशी वारंवार झालेल्या चर्चा अयशस्वी ठरल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, महाविकास आघाडीने अद्याप जागावाटपाचा तिढा सोडविला नाही आणि आम्हाला अपेक्षित प्रतिसादही दिला नाही, त्यामुळे आम्ही काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे नमूद करत, हा प्रस्ताव भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे आंबेडकर हे महाविकास आघाडीतून जवळपास बाहेर पडल्याचे मानले जात असून, ते राज्यातील ४८ पैकी ४१ जागांवर आपला उमेदवार देणार असल्याचेही निश्चित मानले जात आहे. आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खारगे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे, की ‘१७ मार्चरोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही सविस्तर संभाषण करू शकलो नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता, सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. महाविकास आघाडीत ‘वंचित’ला समान न्याय न देण्याच्या वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य एजेंडा भाजप, आरएसएस, फुटीरतावादी आणि लोकशाही संपविणार्या विरोधात आहे. या विचाराने आम्ही महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलेले आहे.
पत्रातील ठळक मुद्दे
– १७ मार्च रोजी मुंबईतील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे.
– लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे.
– शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.
– वंचित बहुजन आघाडीचा मुख्य एजेंडा – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे हा आहे. या विचाराने मी महाराष्ट्रातील ७ जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
– मी तुम्हाला विनंती करतो की, मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून ७ मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या ७ जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राउंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल.
– वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे.
भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा प्रस्ताव?
तुम्हाला विनंती आहे की, मला महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या कोट्यातील ७ मतदारसंघांची नावे द्यावीत, आमचा पक्ष तुमच्या पसंतीच्या या ७ जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छ नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. सद्या, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून एकमत होतांना पाहायला मिळत नसून, अशात आता प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांना पत्र लिहून राज्यातील सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा देऊ, या मतदारसंघांची नावे आपण कळवाली, असा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे Dाांबेडकर हे महाविकास आघाडीतून जवळपास बाहेर पडले असल्याचे दिसून येत आहे.
…म्हणून त्यांनी त्या 7 जागांची माहिती द्यावी.
: @Prksh_Ambedkar pic.twitter.com/oqs0Q9WuQ2
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 19, 2024
प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पक्षाने ही भूमिका घेतली, की आपण महाविकास आघाडीतील हिस्स्याला ज्या जागा येतील. त्या जागांवर काँग्रेस पक्षाने आम्हाला सांगावे. आमच्या मदतीने ते जिंकू शकतात, त्या सात जागांवर वंचित आघाडी त्यांना पाठिंबा देईल. आम्ही प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. ही ऑफर आमची कायम आहे. ‘वंचित’च्या ताकदेमुळे भाजप महाराष्ट्रात ढासळलेली आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी त्यांना पक्ष फोडल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष उभा केला. त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेदेखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
——