Head linesPolitical NewsPoliticsVidharbha

केवळ स्वतःचीच सोय लावल्याबद्दल रविकांत तुपकर हे राजू शेट्टीवर भडकले!

– माझे राजकीय गुरू शरद जोशीच, शेट्टी हे कधीच नव्हते : रविकांत तुपकर
– बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार; अपक्ष लढणार असल्याचे केले स्पष्ट!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात सहा जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार अशी घोषणा करून फक्त हातकणंगलेच्या जागेवर महाविकास आघाडीचा पाठिंबा मागणार्‍या राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच खवळले असल्याचे आज दिसून आले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करत, राजू शेट्टी हे फक्त स्वत:चाच विचार करतात आणि कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडतात, असा आरोप पुन्हा एकदा तुपकर यांनी केला. शेट्टी हे माझे राजकीय गुरू कधीच नव्हते, शरद जोशी हेच माझे राजकीय गुरू होते. त्यांनाच मी माझा राजकीय गुरू मानतो, असेही तुपकर यांनी नीक्षून सांगितले.
पहा फेसबुक लाईव्ह

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून तुपकर हे अपक्ष मैदानात उतरत असून, त्यांच्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचे उमेदवार अडचणीत आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुपकर हे लोकसभा निवडणुकीची तयारी करत असून, ते महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, या पक्षांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने ते अखेर स्वतंत्र मैदानात उतरले आहेत. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या जोरदार टीका केली. राजू शेट्टी हे स्वार्थी राजकारणी असून, ते फक्त स्वत:चा विचार करतात, वाटाघाटी करतात आणि आपल्या भागातील (पश्चिम महाराष्ट्र) एक-दोन जागा घेतात आणि इतर कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना वार्‍यावर सोडतात. शेट्टी हे माझे राजकीय गुरू कधीच नव्हते, शरद जोशी हेच माझे राजकीय गुरू होते. त्यांनाच मी माझा राजकीय गुरू मानतो, असेही तुपकर म्हणाले. आपण स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची समिकरणे बिघडली आहेत. परंतु, ‘शेतकरी हाच माझा पक्ष’ असून, जनशक्तीविरुध्द धनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. आपण, अद्याप उद्धव ठाकरे यांना भेटलो नाही, तशी चर्चा केली नाही. फक्त बातम्या येत आहेत. शरद पवारांनी माझे नाव उद्धव ठाकरेंकडे सांगितले, हे मला माहिती नाही. गावगाड्यातील शेतकरीच माझा पक्ष आहे. सामान्य माणूस म्हणजे आपला पक्ष आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी निवडून येणार, असा विश्वासही तुपकरांनी व्यक्त केला. यापूर्वी राजू शेट्टीसह अनेक नेते अपक्ष खासदार झाले आहेत. निवडणुकीत पैशाची गरज नाही. लोकच मला वर्गणी देत आहेत. निवडणुकीत तेच मतदान करतील. शेतकर्‍यांचा नेता म्हणून दिल्लीत जायचे. त्यासाठी सगळ्यांनी तयारी केलीय. राजू शेट्टी हे फक्त स्वतःच पाहतात आणि आघाडीत वाटाघाटी करतात. मग आम्ही का फक्त भजन करत बसायचं का?, असा संतप्त सवालही तुपकर यांनी उपस्थित केला. राजू शेट्टी यांच्या भूमिकेशी मी सहमत नाही, ते त्यांची भूमिका काय घायाची ते घेतील. संघटना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यांनी काय निर्णय घायचा तो घ्यावा. कुण्या पक्षाचा पाठिंबा मिळेल असे वाटत नाही. फाईट जी होणार ती फक्त माझ्याशीच होणार. तसेच ‘मी प्रस्थापितांसारखा निवडणूक लढवणार नाही, कारण मी चळवळीतला फाटका कार्यकर्ता आहे. गावागावातून एक लाख, दोन लाख रुपयांची वर्गणी माझ्यासाठी देत आहेत. माझा बुलढाण्याचा दौरा संपलेला आहे. प्रस्थापित राजकारण्यांना लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे चांगल्या चेहर्‍याच्या शोधात लोक आहेत. आम्ही जो २२ वर्ष चळवळीतून संघर्ष केला, त्या संघर्षाचे चीज झाले पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लोकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे,’ असेही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले.


राजू शेट्टींची भूमिका संशयास्पद…

‘आधी ते म्हणत होते की, आम्ही ६ जागांवर स्वतंत्र लढू, त्यानंतर म्हणाले की, महाविकास आघाडीने मला एकट्याला पाठिंबा दिला, तर बाकीच्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. म्हणजेच, त्यांची भूमिका फारच संशयास्पद आहे. त्यांची भूमिका तशीच असते. त्यात काही नवीन आहे असे नाही.’, असे म्हणत तुपकर यांनी राजू शेट्टींच्या भूमिकेशी सहमत नाही, असे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या आहेत. राजू शेट्टी यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितला आहे. त्या बदल्यात राज्यभर महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतल्याने रविकांत तुपकर हे खवळले आहेत. शेट्टी यांनी स्वतःचा स्वार्थ पाहण्यासोबतच बुलढाणा मतदारसंघात रविकांत तुपकरांसाठीही आग्रह धरला असता तर तुपकर हे महाविकास आघाडीच्यावतीने शेट्टी यांच्याप्रमाणेच महाविकास आघाडीचे उमेदवार असते, व तसे झाले असते तर तुपकरांचा विजय फारच सोपा झाला असता. या मतदारसंघात तुपकरांची जोरदार लाट असली तरी, त्यांना मोदी लाटेचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!