– नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या ‘सीईओ’पदी बदली
बुलढाणा (बाळू वानखेडे) – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती झालेले सनदी अधिकारी (आयएएस) तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र विशाल नरवाडे यांची अखेर राज्य शासनाने धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी तडकाफडकी बदली केली आहे. बुलढाणा ‘झेडपी’ला श्री अंकित हे नवे ‘सीईओ’ येत आहेत. आपल्या अनेक निर्णयांनी नरवाडे हे चर्चेत आले होते. ते धाड येथील रहिवासी होते. मुळात त्यांना स्व-जिल्हा मिळालाच कसा? याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच, चिखली, मेहकरचेही ‘कनेक्शन’ तपासून पाहिले जात होते; त्यांच्या बदलीने अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे दीड महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आली. खरे तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकार्याला किंवा कर्मचार्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती दिली जात नाही. विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय आजाद हिंद संघटना व विरोधकांनी केली होती. नरवाडे हे मूळचे धाड या गावचे रहिवासी आहे तर त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारीही आहेत. त्यामुळे नरवाडे यांच्या नियुक्तीने लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते, असे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकार्यांमार्फत दाखल झालेल्या तक्रारीत नमूद होते. या तक्रारीची निवडणूक आयोगाने अखेर दखल घेतली असून, राज्य शासनाने नरवाडे यांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे. मागील महिन्यात १ फेब्रुवारी २०२४ रोजी विशाल नरवाडे यांनी संध्याकाळच्या वेळेस सीईओ पदाचा पदभार अत्यंत घाईघाईत स्वीकारला होता. भ्रष्टाचार मुक्त आणि शिस्तबद्ध प्रशासन देण्याचा त्यांनी जिल्ह्यात प्रयत्न केला.
आज राज्य सरकारने केलेल्या बदल्या –
१.श्री अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
२.श्री संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
३.श्री राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर.
४.श्री विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.
५ श्री अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
६ श्री अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर.
७.श्री कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर.
८.श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर.
९.श्री संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर.
१०.श्री शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर.
११.श्री पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर.
१२.डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर.