– उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद यात्रेला सिंदखेडराजा, मेहकरात तुफान प्रतिसाद; ठाकरेंनी निवडणुकीचे वारे फिरवले!
मेहकर/सिंदखेडराजा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी पसंत नाही. ज्याने ज्याने गद्दारी केलीय; तो इथल्या मातीत कायमचा गाडला गेलाय, हा इतिहास आहे. हा इतिहास पुन्हा घडणार! ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार, खासदार केलं होतं, त्याचं गद्दारांना आता माझा शिवसैनिक ह्या मातीत गाडणार! तुझी आमदारकी, खासदारकी हाच शिवसैनिक याच मातीत गाडणार, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना बंडखोरांना मेहकरातील अतिविराट अशा जाहीर सभेतून ठणकावून सांगितले. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करताय; त्याला धमक्या देताय, फक्त थोडे दिवस थांबा, असा सूचक इशाराही ठाकरेंनी बंडखोरांना दिला.
उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा आज (दि.२०) बुलढाणा जिल्ह्यात पोहोचली होती. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या चरणी लीन होऊन आणि मॉसाहेबांचे आशीर्वाद घेऊन ठाकरे हे सिंदखेडराजा व मेहकर येथील विराट जाहीरसभांना हजर झाले. कट्टर शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उत्स्फूर्तपणे या सभांना गर्दी केली होती. शिवसैनिकांचा उत्साह तर अवर्णनीय असा होता. ठाकरेंच्या या जोरदार सभांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे वारे फिरवले आहे. या सभांतून ठाकरे यांनी शिवसेना बंडखोरांवर तुफान हल्ला चढविला. सिंदखेडराजा येथील सभेत ठाकरे यांनी भाजपच्या राज्यातील राजकीय पक्ष फोडाफोडीचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सभागृहात केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. ‘एक अकेला सब पे भारी’ असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते. तोच धागा पकडत ठाकरे यांनी बोचरी टीका केली. ‘एकटा भारी म्हणता, मग उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी कचर्याची गाडी का फिरवता? कोपर्या-कोपर्यातला कचरा का जमा करता? सगळा कचरा गोळा करून उद्धव ठाकरेंशी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मला संपवायचा प्रयत्न करायचाच असेल तर करून बघा. गाठ माझ्या मावळ्यांशी आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी-शाहांना ठणकावले. तसेच, या शिवरायांच्या महाराष्ट्रात मोदी लाट वैगरे काही चालत नाही, येथे फक्त ठाकरे नाव चालतं. म्हणून एक ठाकरे ते सोबत घ्यायला निघाले आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला राज ठाकरेंच्या महायुतीतील समावेशावरून हाणला. मुख्यमंत्री असताना कोरोना काळात राज्याच्या जनतेने मला पूर्ण साथ दिली. स्वत:च्या कुटुंबातील भाऊ, मुलगा मानले. कुटुंबप्रमुख मानले. माझी प्रत्येक सूचना मान्य केली. त्यामुळेच आपण महाराष्ट्र वाचवू शकलो. तशीच साथ येणार्या लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडण्यासाठी आणि हुकूमशाही मोडून काढण्यासाठी द्या. कितीही भूलथापा मारल्या तरी भाडोत्री जनता पक्षाच्या नादी लागू नका, असे आवाहन ठाकरे यांनी उपस्थित जनतेला केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव व आ. डॉॅ. संजय रायमुलकर यांचा बालेकिल्ला असलेल्या मेहकरातील विराट अशा जाहीर सभेत तर त्यांनी शिवसेना बंडखोरांवर तुफान हल्ला चढविला. या विराट सभेच्यानिमित्ताने शिवसैनिकांनी आपली मजबूत एकजूट दर्शविली. हिच एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. आमच्या महाराष्ट्राच्या मातीला गद्दारी पसंत नाही. ज्याने ज्याने गद्दारी केलीय; तो इथल्या मातीत कायमचा गाडला गेलाय, हा इतिहास आहे. हा इतिहास पुन्हा घडणार! ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार, खासदार केलं होतं, त्याचं गद्दारांना आता माझा शिवसैनिक ह्या मातीत गाडणार! ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करताय; फक्त थोडे दिवस थांबा, असा सूचक इशाराही त्यांनी बंडखोरांना दिला. शिवसैनिकांना शिव्या, धमक्या देणार्या आमदारांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. खाऊन खाऊन माजलेत, यांना माजून सूज आली आहे. एवढा माज आला असेल तर यांचे भाडोत्री गुंड व माझे शिवसैनिक यांच्यातून एकदा पोलिस हटवून बघा, मग यांना दाखवतो. माज कसा उतरवायचा हे मलाही जमते, अशा भाषेत त्यांनी शिवसैनिकांना धमक्या व शिवीगाळ करणार्या बंडखोरांचा समाचार घेतला. धर्मवीर स्व. दिलीपराव रहाटे यांचेही याप्रसंगी ठाकरे यांनी स्मरण केले. दिलीप रहाटेंनी लावलेल्या वृक्षाचा महावृक्ष झाला म्हणून तुम्हाला सत्तेची फळे चाखायला भेटली. तुम्ही पदे भोगलीत, आता गद्दारी केली म्हणून जनतेचे फटकेही खा. निवडणुकीत हे गद्दार धबधब्यासारखे पैसे ओततील, त्यांच्याकडे संपत्ती आली आहे, पण माझ्याकडे ही समोर बसलेली विराट अशी जनसंपत्ती आहे, असेही ठाकरेंनी नीक्षून सांगितले.
याप्रसंगी मेहकर व जिल्ह्यातील गुंडगिरीचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील खरपूस समाचार घेतला. तुम्ही गुंड असाल तर आम्हीही महागुंड आहोत. पण आम्ही समाजाच्या चांगल्या कामासाठी गुंडगिरी करतो. ज्यांच्या नावावर हे दादागिरी आहेत ते मोदी आणि शाह हेदेखील सत्तेत राहणार नाहीत, आता इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे, तेव्हा यांना दाखवून देऊ, असा इशाराही खा. राऊत यांनी दिला.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जालिंधर बुधवत, प्रा. नरेंद्र खेडेकर यांचेही घणाघाती भाषणे झालीत. सिंदखेडराजा व मेहकर येथील सभेपूर्वी उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, खा. संजय राऊत, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व इतर नेत्यांनी राजमाता जिजाऊ मॉसाहेब व मेहकर येथे शारंगधर बालाजी यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी काँग्रेस नेते श्याम उमाळकर, आशीष रहाटे यांच्यासह स्थानिक नेत्यांचीही उपस्थिती होती.
—————