अन् आमदाराच्या व्हीआयपी गाडीने विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेत आल्या!
– बसची वाट पाहून थकलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना आमदारांनी स्वतःच्या गाडीने सोडले शाळेत!
हिवरा आश्रम, ता. मेहकर (समाधान म्हस्के) – येथील पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदीर व महाविद्यालयात पंचक्रोशीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात. परंतु, आज (दि.१९) एसटी महामंडळाच्या बसने हुलकावणी दिल्याने नांद्रा धांडे फाट्यावर बसची वाट पाहून थकलेले विद्यार्थी, व विद्यार्थिनी अक्षरशः रडकुंडीला आले होते. तेथून जाणार्या आ. रायमुलकर यांनी या मुला-मुलींची विचारपूस केली असता, त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली, व क्षणाचाही विलंब न करता आमदारांनी आपल्या व्हीआयपी गाडीतून ८ ते १० मुला-मुलींना हिवरा आश्रम येथील शाळेत पोहोचते केले. आमदारांच्या या समयसूचकता व साधेपणामुळे आजची शाळा बुडली नाही म्हणून या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर स्मीतहास्य खुलले होते.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून हिवरा आश्रम गावाची राज्यात ओळख आहे. येथील शाळा व महाविद्यालयात पंचक्रोशीतील हजारो मुले-मुली दर्जेदार शिक्षण घेतात. आज नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी नांद्रा धांडे येथील मुले-मुली फाट्यावर बसची वाट पाहात उभे होते. परंतु, शाळेची वेळ झाली तरी बस आली नाही, म्हणून ही मुले-मुली अक्षरशः रडकुंडीला आली होती. आ. संजय रायमुलकर यांचे नांद्रा धांडे हे गाव आहे. ते तेथून जात असताना त्यांना ही रडकुंडीला आलेली मुले-मुली दिसलीत. त्यांची या मुलांची विचारपूस केली असता, बस आली नसल्याचे त्यांना समजले. आमदारांनी क्षणाचाही विलंब न करता या जवळपास ८ ते १० मुला-मुलींना आपल्या गाडीत घेतले व त्यांना हिवरा आश्रम येथे आणून सोडले. तसेच, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनाही फोन लावून शाळेच्या वेळा लक्षात घेता वेळेवर बस सोडत जा, असा दम अधिकार्यांना भरला. आमदारांच्या समयसूचकता व कर्तव्यदक्षतेमुळे आजची शाळा बुडाली नाही म्हणून या मुला-मुलींच्या चेहर्यावर हास्य खुलले होते. हिवरा आश्रम येथे ही मुले-मुली पोहोचले तेव्हा तेथे सरपंच मनोहर गिर्हे पाटील, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, माजी नगरसेवक रामेश्वर भिसे, वरिष्ठ पत्रकार समाधान म्हस्के पाटील, रामा अत्तारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
———-