पुढील ४८ तासांत जागावाटपाचा तिढा सुटणार; महायुतीची दिल्लीत खलबते; महाआघाडीकडून ‘वंचित’कडे निर्णायक विचारणा!
– महायुतीत येणार तिसरा भिडू; राज ठाकरे नवी दिल्लीत अमित शाहांच्या भेटीला; बैठकांचे सत्र सुरू!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – घासाघीस करत अखेर महाविकास आघाड़ीच्या लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे) २२, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्ष १० जागा लढणार असल्याचे सूत्रांचे म्हणने आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाड़ीला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचीही सूत्रांची माहिती असून, सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा लोकसभेची जागा शिवसेना (ठाकरे) गटाचीच राहणार असल्याचे सूत्राने स्पष्ट केले. वंचित आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा जाणार असून, त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आज संध्याकाळपर्यंत भूमिका कळवा, असे महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना कळविण्यात आल्याचेही सूत्राने स्पष्ट केले. दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपाचा तिढाही आजच सुटण्याची शक्यता असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू आहे. राज ठाकरे हेदेखील या बैठकीला असून, मनसेचीही महायुतीत एण्ट्री होण्याचे निश्चित मानले जात आहे.
लोकसभा निवड़णुकीची घोषणा झाली असली तरी विविध पक्षांचे जागावाटप मात्र अद्याप पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रातील जागावाटपातही ताणाताणी सुरू असल्याची माहिती आहे. भाजपाने २० जागांचे उमेदवार घोषित करून आघाड़ी घेतली असली तरी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र लटकवत ठेवल्याचे दिसून येते. पुढील चोवीस तासात जागावाटपाचा तिढा सुटेल, असे महायुतीच्या गोटातून सांगितले जात आहे. असे असताना महाविकास आघाडीनेही घासाघीस करत जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत केल्याची खात्रीशीर सूत्राची माहिती आहे. यामध्ये शिवसेना (ठाकरे) २२ जागा लढणार असून, यामध्ये बुलढाणासह ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, सांगली, हातकणंगले, यवतमाळ, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जळगाव, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक व शिर्ड़ी या जागा ठाकरे गट लढणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले, तर काँग्रेसच्या वाट्याला उत्तर-पश्चिम मुंबई, कोल्हापूर, लातूर, नांदेड, जालना, धुळे, पुणे, नंदूरबार, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती व गड़चिरोली तर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार पक्षाला नगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंड़ी, रावेर, दिंड़ोरी, बीड, शिरूर व बारामती यासह १० जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाड़ीला अकोलासह शिर्ड़ी, सोलापूर, रामटेक या चार जागांचा प्रस्ताव महाआघाडीने दिल्याची सूत्रांची माहिती आहे. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सांगून, दिलेल्या जागांबाबत आज संध्याकाळपर्यंत भूमिका कळवा, असे प्रकाश आंबेडकर यांना महाआघाडीकडून सांगण्यात आल्याचे सूत्राने स्पष्ट केलेले आहे.
महाविकास आघाडीकडे दोन फॉर्म्युले तयार!
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२-१६-१० असा राहील, त्यानुसार ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच, वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, २०-१५-९-४ हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थिती ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
————-
राज ठाकरे दिल्लीत आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया..
“माझं शेड्युल्ड काय आहे अद्याप मला माहिती नाही, मला फक्त ‘या म्हणून’ सांगितलंय. आता दिल्लीत आलोय. पाहू !” pic.twitter.com/ms34MejMcE
— Ramraje Shinde (@ramraje_shinde) March 18, 2024