ChikhaliVidharbha

माजी जिल्हा परिषद सदस्याने सार्वजनिक रस्ता बांधकाम करून अडविला; रस्त्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार!

– पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर अंत्यसंस्कार मार्गी; अतिक्रमणधारकाला कोण पाठीशी घालतयं?

चिखली (तालुका प्रतिनिधी) – एका माजी जिल्हा परिषद सदस्याने स्मशानभूमीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता बांधकाम करून अडविला असल्याने ग्रामस्थांत तीव्र संतापाची लाट असताना, सोमवारी सकाळी एका मृतदेहाचा अंत्यविधी करण्यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. स्मशानभूमीत जाण्यासाठी जाऊ दे, असे ग्रामस्थांनी व मृतकाच्या नातेवाईकांनी विनवणी करूनही अतिक्रमणधारक बधला नाही. परिणामी, संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच तिरडीसह ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने रस्त्यावरच अंत्यसंस्कार उरकावे लागले. तालुक्यातील धोडप येथे हा दुर्देवी तितकाच संतापजनक प्रकार घडला. ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊन या अतिक्रमणधारकाला धडा शिकवण्यापूर्वी त्याचे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. हा अतिक्रमणधारक माजी जिल्हा परिषद सदस्य कुणाच्या जोरावर इतक्या उड्या मारत आहे? असाही संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील धोडप येथील श्रीराम रामराव कोल्हे यांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेण्याचे ठरविले. मात्र, स्मशानभूमीत जाणारा सरकारी रस्ता एका माजी जिल्हा परिषद सदस्याने दादागिरीच्या जोरावर अडवून ठेवलेला आहे. ही जागा माझ्या मालकीची असल्याचे तो म्हणतो, तसेच त्याची खरेदी असल्याचेही तो सांगतो. स्मशानभूमीत जाण्याच्या रस्त्यात या व्यक्तीने भिंत बांधली असून, लोखंडी गेटदेखील लावलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह अंत्यविधीला नेता येत नव्हता. ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला रस्त्यातील अतिक्रमण हटविण्याची विनंती केली. परंतु, अजिबात माणुसकी नसलेला हा निदर्यी अतिक्रमणधारक माजी जिल्हा परिषद सदस्य ग्रामस्थांचे ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मृतक श्रीराम कोल्हे यांचा मृतदेह रस्त्यातच ठेवला. त्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी एकच गोंधळ सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. या घटनेने गावात तणावाचे वातावरण तयार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो खरेदीची कागदपत्रे दाखवत पोलिसांचेही ऐकत नव्हता. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी पोलिसांच्या उपस्थितीत ज्या व्यक्तीने अतिक्रमण करून गेट बनवून रस्ता अडवला होता. त्याच गेटसमोर म्हणजे रस्त्यातच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे चिखली पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. श्रीराम कोल्हे यांचा मृतदेहावर अंत्यविधी करताना शेकडो लोक जमले होते. महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी पोलिसदेखील उपस्थित होते. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहावर अग्नी दिल्याचे पाहायला मिळाले. या व्यक्तीचे प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटविले नाही व सार्वजनिक सरकारी रस्ता खुला करून दिला नाही तर संतप्त ग्रामस्थ कायदा हातात घेऊन या मुजोर व्यक्तीला धडा शिकविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चिखली तहसीलदारांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा सार्वजनिक रस्ता खुला करावा, व अतिक्रमणधारक माजी जिल्हा परिषद सदस्याकडे असलेली खरेदीखत रद्द करावे, अशी मागणी धोडप ग्रामस्थांतून केली जात आहे.

धोडप येथील रहिवासी असलेला हा माजी जिल्हा परिषद सदस्य सदरची जागा माझ्या मालकीची असून, ती मी खरेदी केली असल्याचे सांगतो. परंतु, याबाबत गावातील लोकांनी १२ ऑगस्ट २०२२ रोजीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडे एक तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. या अर्जात नमूद आहे, की गावातील धनदांडगा असलेल्या या राजकीय नेत्याने हा सार्वजनिक रस्ता अडविलेला असून, त्यावर बांधकाम केलेले आहे. गावातील महापुरूषांच्या मिरवणुका, धार्मिक उत्सव, अंत्ययात्रा याच रस्त्याने पूर्वपार परंपरेने जात आहेत. हा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता असून, तो खुला करून देण्यात यावा. हा अतिक्रमणधारक व्यक्ती राजकारणी असल्याने गावातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हा रस्ता खुला करण्याचे धाडस करत नाही. तब्बल २१ ग्रामस्थांच्या सह्यानिशी दिलेल्या या अर्जावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदारांनीच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा रस्ता खुला करून अतिक्रमण तोडून टाकावे, अशी मागणी गावातील संतप्त ग्रामस्थ करत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!