बुलढाण्यात तुल्यबळ अशी तिहेरीच लढत; दोघांच्या लढतीत ‘तिसरा’ मारेल बाजी?
– महायुतीकडून प्रतापराव जाधव तर महाआघाडीकडून तूर्ततरी प्रा. नरेंद्र खेडेकरांचेच नाव आघाडीवर!
पुरूषोत्तम सांगळे
बुलढाणा/मुंबई – बुलढाण्यातील बहुचर्चित अशा लोकसभेच्या तुल्यबळ लढतीत तिहेरीच सामना रंगणार असून, शिंदे सेनेकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचीच उमेदवारी फायनल मानली जात आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष काहीही असले तरी ‘हॅटट्रिक’ साधण्याच्या बेताने प्रतापराव हे मैदानात उतरणार आहेत. त्यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दंड थोपाटलेच आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रा. नरेंद्र खेडेकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी खेडेकर हे उमेदवार दिले तर, जाधव-खेडेकर यांच्या लढतीत तुपकरांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो. तथापि, ठाकरे यांनी तुपकरांना उमेदवारी दिली तर मात्र विजयाची फक्त औपचारिकता उरेल, अशी चर्चा शिवसेनेच्या कट्टर समर्थकांतून तसेच जनमाणसातून ऐकायला येत आहे. त्यामुळे तुपकरांना डावलण्याची चूक उद्धव ठाकरे यांना महागात पडू शकते, अशीही चर्चा जिल्ह्यात रंगताना दिसत आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तुल्यबळ, चुरशीची आणि धक्कादायक निकाल देऊ शकणारी ही निवडणूक होत आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जागावाटपावरून महाआघाडी व महायुतीत सद्या राजकीय पेच निर्माण झाला असून, एका राष्ट्रीय पक्षाने तब्बल ८ वेळा पक्षांतर्गत सर्वेक्षण करून जिल्ह्याचा कौल जाणून घेतला असता, हा कौल धक्कादायक आल्याचे या पक्षाच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय पक्ष आपला उमेदवार या मतदारसंघात देण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे, तशी त्यांनी जोरदार तयारीदेखील केलेली आहे. परंतु, दुसरीकडे, विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनीही आपल्या भात्यातील सर्व अस्त्रे बाहेर काढून आपलीच उमेदवारी कायम राहील, अशी ‘फिल्डिंग’ लावली आहे. सद्या तरी त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने, जाधव-खेडेकर यांच्या लढतीचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना फायदाच होणार आहे. हिंदुत्ववादी मतांच्या विभाजनात शेतकरी-कष्टकरी समाजाची मते तुपकरांना कायम राहिली तर तुपकरांच्या विजयाचा वारू जोरदार उधळू शकतो. रविकांत तुपकर हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती असून, त्यामुळे ठाकरे यांनी बुलढाण्यातील आपला उमेदवार जाहीर करण्यास टाळाटाळ चालवली असावी. वास्तविक पाहाता, जिल्हावासीयांचा कौल लक्षात घेता, तुपकरांना शिवसेनेकडून (ठाकरे) उमेदवारी मिळाली तर तुपकरांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी उरेल, असे राजकीय चित्र असताना, ठाकरेंचे दरबारी राजकारण आडवे येत असल्याने तुपकरांचा आवाज उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचत नसल्याचे दुर्देवी चित्र आहे, असे खात्रीशीररित्या कळते आहे. तथापि, जागावाटपाचे फॉर्म्युले काहीही ठरणार असले तरी, बुलढाण्यात तुल्यबळ अशी तिरंगीच लढत होणार असून, दोघांच्या घमासान लढतीत, तिसराच बाजी मारून जाईल, अशी या जिल्ह्याची मानसिकता निर्माण झाली आहे.
देशात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीची अधिसूचना २८ मार्चरोजी जारी होईल, याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ एप्रिलला उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील, २६ एप्रिलरोजी मतदान पार पडणार असून, ४ जूनरोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत. पुढील ४८ तासांत शिंदे सेनेची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या यादीत खासदार प्रतापराव जाधव यांचे निश्चित नाव असेल, असे शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्याने खात्रीने सांगितले आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील उमेदवार जाहीर करण्याचे वारंवार टाळले आहे. २० मार्चरोजी त्यांचा बुलढाणा जिल्हा दौरा असून, या दौर्यात तरी ते उमेदवार जाहीर करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच मेहकर येथील त्यांच्या सभेकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागून आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे उमेदवारी निश्चित मानून कामाला लागले असले तरी, शेतकरी नेते रविकांत तुपकर व काँग्रेसच्या स्थानिक नेत्या जयश्री शेळके हेदेखील ठाकरे यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावून असल्याची खात्रीशीर माहिती आहे. एका राष्ट्रीय पक्षाने केलेल्या पक्षांतर्गत सर्वेक्षणात रविकांत तुपकर यांना ६९ टक्के लोकांची पसंती असल्याची बाब कानावर आलेली आहे. तसेच, ठाकरेंच्या शिवसेना गोटातूनही तुपकर यांना उमेदवारी दिली तर प्रतापराव जाधव यांचा पराभव करणे शक्य होईल, असा निरोप ठाकरे व संजय राऊत यांच्यापर्यंत गेले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे ठाकरे यांनी तुपकरांना उमेदवारी डावलली तर जाधव व प्रा. खेडेकर यांच्या तुल्यबळ लढतीत जिल्हावासीयांचा तुपकरांना कौल मिळणे क्रमप्राप्त असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बुलढाणा जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लढण्याव्यतिरिक्त महायुतीकडे फारसे ठोस मुद्दे नाहीत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष फुटल्याने त्यांच्या मतांची मोठी ताटातुट झालेली आहे. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठी आहे. महाविकास आघाडीकडून कुणालाही उमेदवारी दिली गेली तरी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार हे महाआघाडीच्याच उमेदवाराला मते देतील, याची शाश्वती नाही. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना विधानसभेला पक्ष देईल तो उमेदवार चालवू, पण लोकसभेला आम्ही रवीभाऊंनाच साथ देणार आहोत, अशी खासगीत भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना उमेदवार देताना काळजी घ्यावी लागणार असून, केवळ सहानुभूतीच्या मुद्द्यावर बुलढाण्याची जनता मतदान करण्याच्या मानसिकतेत नाही, हे लक्षात घ्यावे लागणार आहे. रविकांत तुपकरांनी शेतकरी व शेतीच्या प्रश्नावर केलेले काम मतदार विसरलेले नाहीत, ही तुपकरांसाठी जमेची बाब आहे. त्यामुळेच त्यांच्या दौर्याला बुलढाणेकरांनी डोक्यावर घेऊन त्यांना ‘नोट’ देत ‘व्होट’ही देण्याची ग्वाही दिलेली दिसते. या मतदारसंघात कदाचित प्रतापराव जाधव व प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत झाली तर हे दोन्ही उमेदवार हिंदुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण करणार आहेत. त्याचा फायदा तिसर्या सर्वसमावेशक उमेद्वाराला होणारा आहे. जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी व युवकांनी तुपकरांच्या झोळीत मतांचे दान टाकले तर कमी अधिक फरकाने शेतकर्यांचा हा युवा नेता लोकसभेत पोहोचू शकतो, तर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर मात्र फक्त विजयी मिरवणूकच काढायची तयारी करावी लागेल, असे चित्र जिल्ह्यातील लोकमानसाच्या बोलण्यातून दिसून येत आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २०१९च्या मतदानाप्रमाणे १८ लाख २२ हजार ९५२ इतके मतदार आहेत. त्यातील ४ लाख मतदार हे दलित-आदिवासी समाजातील आहेत. तर २ लाख ११ हजार मतदार हे मुस्लीम आहेत. ग्रामीण भागातून सर्वाधिक मतदार असून, १४ लाख ६९ हजार २९९ इतके मतदान खेड्यापाड्यांतून होते. शहरी भागातील मतदान हे ३ लाख ५३ हजार ६५३ इतके आहे. म्हणजे, कोणत्याही उमेदवाराला जिंकायचे असेल तर खेड्यापाड्यातील मते मिळवणे गरजेचे आहे. मागील लोकसभेला सरासरी ६३.५० टक्के इतके मतदान झाले होते. त्यात प्रतापराव जाधव यांनी ५ लाख ५१ हजार ९७७ मते घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा १ लाख ३३ हजार २८७ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी वंचित आघाडीची मते निर्णायक ठरली होती. डॉ. शिंगणे यांच्या निवडणूक प्रक्रियेत राहिलेल्या रविकांत तुपकरांनी शिंगणे यांच्या पराभवाचा अभ्यास केलेला असावा. त्यातून धडा घेऊन त्यांनी ग्रामीण भागातील मतांवर भर दिलेला आहे. त्यामुळेच ते मतदारसंघातील ८० टक्के गावांत जाऊन आले असून, ग्रामीण जनतेने त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. शेतकरी, कष्टकरी व युवकांत तुपकरांची जोरदार लाट पहायला मिळत आहे. खासदार म्हणून निवडून येण्यासाठी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख मते लागतात. ग्रामीण भागातून इतक्या मतांची बेगामी तुपकरांना होणे शक्य आहे. याच १८ लाख मतदारांतील किती मते ‘हिंदुत्ववादी’ म्हणून खा. प्रतापराव जाधव व प्रा. नरेंद्र खेडेकर यांना जाणार आहे, यावर तुपकरांच्या ‘लीड’चा हिशोब अवलंबून राहील, असे राजकीय धुरिणांचे मत आहे.
मंगळवारी महत्त्वाची बैठक
महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या (दि.19) निश्चित होणार असल्याची माहिती दिली जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे काही वेळापूर्वीच दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भाजप नेतृत्त्वाकडून मंगळवारी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यासाठी मंगळवारी शिंदे गट आणि अजितदादा गटाचे नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादा गट आणि शिंदे गटापेक्षा भाजपच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे जिंकून येऊ शकणाऱ्या नेत्यालाच उमेदवारी द्यावी, असा अमित शाह यांचा आग्रह आहे. त्यासाठी वेळ पडल्यास शिंदे गट किंवा अजित पवार गटातील नेत्यांना कमळाच्या चिन्हावर उभे करावे, असाही प्रस्ताव भाजपच्या गोटातून मांडण्यात आला होता. परंतु, एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यासाठी राजी नाहीत, असे सूत्राने सांगितले.