Breaking newsMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत; शिवतीर्थावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

– नरेंद्र मोदी केवळ मुखवटा, विरोधकांचा लढा एकाव्यक्ती विरोधात नाही एका शक्तीविरोधात: राहुल गांधी
– आरएसएस व मनुवादी शक्तींकडून लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे
– ‘अब की बार, भाजपा तडीपार’ घोषणा गावागावात पोहचवा : उद्धव ठाकरे
– महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज: शरद पवार
– इंडिया आघाडीच्या नेत्यांचा भाजपा व मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल, ‘लढेंगे, मगर झुकेंगे नही’चा निर्धार

मुंबई (खास प्रतिनिधी) – ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाही, या देशाच्या राजाचा आत्मा ईडी, सीबीआय, आणि ईव्हीएममध्ये आहे. भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी सुरू झालेली आहे ती इलेक्टोरल बाँडमध्ये ते दिसून आले आहे. पैसा द्या अन् कंत्राट घ्या, अशा प्रकारची पॉलिसी देशात सुरू झाली आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला. इव्हीएमबाबत कोणीतरी बोललं. मी तु्म्हाला सांगतो की इव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की विरोधी पक्षाला हे मशिन दाखवा. खोलून दाखवा. हे कसं चालतं आमच्या एक्स्पर्टला दाखवा. पण त्यांनी दाखवलं नाही. मतं मशिनमध्ये नाही. मतं कागदात आहे. तुम्ही मशिन चालवा, पण कागदाचीही मोजणी करा. पण ते म्हणतात कागदाची मोजणी करणार नाही. सिस्टमला ही मोजणी नकोय, अशी टीकाही राहुल गांधी यांनी करत, मोदी व भाजपवर जोरदार हल्ला चढविला. शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या अतिविशाल सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी संबोधित करत होते. तर, याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही भाजप व मोदींवर टीकास्त्र डागले. नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी यावेळी केला.

शिवाजी पार्कवरील अतिविराट सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पिडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते. सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल, असा इशारा दिला. सभेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे. अभिनेत्याला जसे भूमिका दिल्या जातात तशाच भूमिका त्यांच्या कडून करून घेतल्या जातात, मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या हिंदुस्थानच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत. विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर VVPAT स्लीप डब्ब्यात पडते त्याचीही मोजणी करा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे. मोदी फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, ईडी ऑफीसमध्ये अनेक तास बसवले पण घाबरलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तसेच इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी हिंदुस्थानचे रक्षण करण्यास एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते. महान व्यक्तींनी एकच संदेश दिला आहे आणि तो म्हणजे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा,असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरण्याचे काम शिवसेने केले आहे. आता भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे. आता लढाई आहे ती लोकशाही व संविधान वाचवण्याची. घटना बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा आहेत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. कोणी कितीही मोठा असू त्याच्यापेक्षा देश मोठा असतो. २०१४ पासून एकाच पक्षाचे सरकार आहे, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जनता एकवटली तर हुकूमशाहीचा अंत होतो. अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा घेऊन गावागावात जा, असे ठाकरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इलोक्टोरल बाँडबदद्ल अमित शाह स्पष्टीकरण देत आहेत पण फ्युचर गेमिंग सारख्या अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी नफ्यापेक्षा जास्त किमतीचे बाँड खरेदी केली, त्यांच्याकडे हा पैसा कुठुन आला, याची चौकशी केली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी भाजपावर टीका करत सेव्ह इंडियाचा नारा दिला व भारत जोडो न्याय यात्रेने देश जोडण्याचे काम केल्याचे म्हणाले. बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव म्हणाले की, कितीही दबाव टाकला तरी आम्ही कोणीही झुकणारे नाहीत, सर्वजण लढणारे आहेत. लालू प्रसाद यांच्यावर दबाव आणला पण ते झुकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपाचे योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला. झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, देशातील हुकुमशाहीविरोधात सर्वजण एकत्र आलो आहेत, ही एकजूट कायम ठेवू व हुकूशाही वृत्तीच्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचू. झारखंड मुक्ती मार्चाच्या नेत्या कल्पना हेमंत सोरेन म्हणाल्या की, आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रातील सरकार पाडले. विरोधकांवार दबाव टाकला जातो. भाजपा सरकारने हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले पण झारखंड झुकला नाही व इंडियाही झुकणार नाही असा निर्धार केला.


भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेतून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देशाचं नाव व संविधान बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप एक फुगा आहे. मला वाईट याचं वाटतं की, या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं. संपूर्ण देशात भाजपचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, त्यांच्या डोक्यात आता हवा गेली. काय त्यांची स्वप्न. 400 पार जागा म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणीही राज्यकर्ता अमर पट्टा घेऊन येत नाही. या देशाच्या जनतेसमोर हुकूमशाही कितीही मोठी असला, ज्यावेळेस सर्व लोक एकवटात त्यावेळी हुकूमशहाचा अंत होतो. आज ती वेळ आलेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास थोडा फोडा आणि राज्य करा असा असेल, त्यामुळे आपल्या मध्ये जो फूट पाडतोय त्याला थोडा आणि त्याच्या छाताडावर राज्य करा अशी सांगायची वेळ आलेली आहे.’
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!