बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यात असलेल्या मौर्यकालीन बुद्ध स्तूपाचे उत्खनन करून त्याचे रक्षण करा. बुलढाणा जिल्ह्यात जिगाव प्रकल्पाच्या जमा होणाऱ्या पाण्यात मौर्यकालीन बुद्ध स्तूप बुडणार असल्यामुळे या विरासतचे रक्षण व्हावे, यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्यावतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवार, दि. १७ मार्च रोजी प्रचंड समाज बांधवांच्या सहभागाने मोर्चा काढण्यात आला.
शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रांगणात मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. वामन मेश्राम, डॉ विलास खरात, कुणाल पैठणकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या नेतृत्वात विविध मार्गाने निघालेल्या या मोर्चाचे टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानावर भव्य सभेत रूपांतर करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध गावांमधून आलेल्या समाज बांधवांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. वाचवायला पाहिजे.. वाचवायला पाहिजे… उत्खनन करा… उत्खनन करा.. बुद्धाची विरासत वाजलेच पाहिजे… यासारख्या घोषणांनी बुलढाणा शहर दणाणून गेले होते. संग्रामपूर तालुक्यातील भोन येथे पूर्णा नदीच्या काठावर प्राचीन संपन्न वस्ती होती. तेथे महाराष्ट्रातील प्राचीनतम विशाल असा मौर्यकालीन बौद्ध स्तूप होता, असे पुणे येथील डेक्कन कॉलेज या संशोधन संस्थेचे डॉ. बी.सी देवतारे यांनी केलेल्या उत्खननातून स्पष्ट झाले आहे. २००२ मध्ये देवतारे यांनी शेगावपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या भोन येथे सर्वेक्षण केले. २००२, २००३, २००४, २००५ व २००६ पर्यंत उत्खनन सुरू होते. उत्खननादरम्यान मौर्यकालीन बौद्ध स्तुपाचे अवशेष सापडले. त्यामुळे त्या ठिकाणी मौर्यकालीन बौद्ध स्तूप असल्याचे सिद्ध झाले. तरीही भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्ली यांनी ८ फेब्रुवारी २००७ ला भोन येथील स्तुपाचा परिसर बुडीत क्षेत्रात घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. म्हणजे जिगाव धरण प्रकल्प बौद्ध वारसा नष्ट करण्यासाठीच बनवला जात आहे, हे स्पष्ट होते, असा आरोप यावेळी करण्यात आला.
आमचा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु या जागतिक बौद्ध वारसाचे जतन व्हावे, याकरिता ती जागा त्वरित पुरातत्व खात्याच्या ताब्यात द्यावी व उत्खनन करून या जागतिक वारसाचे जतन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. याबाबत सर्व वस्तुस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या मोर्चात बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक शहर, गाव, खेड्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.