सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून वाळूतस्करी करणार्या वाळूतस्करांना आपल्या धडाकेबाज कारवाईने दणके देण्याचे काम नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर यांनी सुरूच ठेवले असून, काल पुन्हा पाच टिप्पर पकडून अंढेरा पोलिस ठाण्यात लावले आहेत. या वाळूतस्करांना १३ लाख रूपये दंड होण्याची शक्यता आहे.
सिंदखेडराजा उपविभागात देऊळगावराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण, नारायणखेड, डिग्रस व आसपासच्या रेतीघाटांवरुन अवैधरित्या रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. रेतीमाफियांचे नेटवर्क अद्यावत व स्ट्रॉग असल्यामुळे रेतीमाफिया महसूल अधिकार्यांच्या जाळ्यात येत नाही. मात्र हे नेटवर्क भेदून व जीव धोक्यात घालून महसूल विभागाच्या नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर यांनी धाडसी कारवाई करत एकाच वेळेस पाच टिप्पर पकडून दंडात्मक कारवाईसाठी अंढेरा पोलिसात जमा केले आहे. त्यामुळे शासनाला जवळपास १३ लाख रुपयाचा दंड महसूल मिळणार आहे. या कारवाईमुळे रेतीमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अधिकार्यांच्या डोळ्यात धूळ फेकून या रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत आहे. मात्र अधिकार्यांची जर मानसिकता असेल तर या रेतीचोरीला खरोखरच आळा बसू शकतो, हे नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर आणि त्यांच्या पथकाने दाखवून दिले आहे.
या महसूल अधिकार्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वॉच ठेवून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे एम.एच.२१-बी.एच. ०९३२, एम.एच.२८-बी.बी. ३९३३, एम.एच.- २८-ए.बी.-२३३३, एम.एच.२७-एक्स-५०३८, एम.एच.१३-डी.क्यू. ५२७८ या क्रमांकाच्या टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना रंगेहात पकडून अंढेरा पोलिसाना घटनास्थळी बोलावून सदर टिप्पर दंडात्मक कारवाईसाठी अंढेरा पोलिस स्टेशनला लावण्यात आले. या पथकात तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर, मंडळ अधिकारी रामदास मांटे, तलाठी बरांडे, संजय हांडे, पंढरी जायभाये,नागरे, सागर देशपांडे, सानप, डोईफोडे, वाकोडे यांचा समावेश होता.
—————