चिखली (महेंद्र हिवाळे) – लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील दारूचा महापूर रोखण्यासाठी पोलिस व उत्पादन शुल्कचे अधिकारी कामाला लागले असून, रायपूर पोलिसांनी ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या नेतृत्वात धडक कारवाई करत, साखली, शिरपूर, सैलानी व रायपूर या भागात धाडी घातल्या व गावठी दारूविक्रेत्यांवर कारवाई केली.
चिखली तालुक्यातील रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत साखळी, शिरपूर, सैलानी व रायपूर येथे रायपूर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने आज (दि.१७) केलेल्या कारवाईत चार आरोपींकडून १३ हजार २८५ रूपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपी सचिन इंगळे रा. साखळी याच्याकडून देशी दारू संत्रा व विदेशी दारू किंमत ७७१५ रूपये, शिरपूर येथील महिला आरोपी हिच्याकडून देशी दारू माल किंमत २४५० रूपये, दत्ता गायके रा. सैलानी याच्याकडून देशी व विदेशी दारू किंमत २२८० रूपये तर कैलास आत्माराम झगरे रा. रायपूर याच्याकडून ८४० रूपये असा एकूण १३ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई रायपूरचे एपीआय दुर्गेश राजपूत व उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्यांनी केली.