ChikhaliCrimeVidharbha

चिखली पंचायत समितीतला ‘रावडी’ अखेर रंगेहाथ जाळ्यात!

चिखली (महेंद्र हिवाळे) – पंचायत समितीमध्ये समाज कल्याण विभागात लिपीक म्हणून कार्यरत असलेला रविंद्र हिंमतराव भंडारे उर्फ ‘रावडी’ याला 6 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. आज (दि.14) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई पंचायत समितीतच करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे, तसेच पंचायत समितीतील लाचखोरांना चांगलाच धाक निर्माण झाला आहे.

पंचायत समितीत ‘रावडी’ म्हणून ओळखला जाणारा रविंद्र भंडारे याच्यासंदर्भातील लाचखोरीच्या अनेक चर्चा पंचायत समितीत रंगत होत्या. परंतु, आपले कुणी काहीच वाकडे करू शकत नाही, अशा तोर्‍यात तो वावरत होता. गुंजाळा येथील समाधान केदार यांनी समाज कल्याणाच्या योजनेसाठी दाखल केलेले प्रकरण मंजूर करून देण्यासाठी या लाचखोर भंडारे याने केदार यांच्याकडे 12 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्याला सुरूवातीला हजार रूपयेही दिले. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने केदार यांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कानावर घातली. त्यानुसार सापळा रचण्यात येऊन या लाचखोर भंडारे उर्फ ‘रावडी’ला एसीबीच्या पथकाने लाचेचा पहिला हप्ता 6 हजार रूपये घेताना रंगेहाथ पकडले आहे. आज (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.

अशी झाली कारवाई…

तक्रारदार केदार यांनी कुटुंबीयांच्या नावे इलेक्ट्रीक पंप, एचडीपीई स्प्रिंकलर पाईप, शिलाई मशीन मिळण्याकरिता प्रकरण दाखल केले होते. त्यावर हे प्रकरण मंजूर करून सामाजिक योजनेचा लाभ देण्यासाठी लाचखोर भंडारे याने त्यांना १२ हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी एक हजार रूपयांची लाच स्वीकारलीही होती. भंडारे हे उर्वरित ११ हजार रूपयांची लाच मागत असल्याबाबत तक्रारदार केदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, एसीबीच्या पथकाने सापळा रचून रविंद्र भंडारे याला लाचेचा पहिला हप्ता सहा हजार रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी रविंद्र हिंमतराव भंडारे (वय ५४) कनिष्ठ सहाय्यक वर्ग – ३ समाजकल्याण विभाग, पंचायत समिती चिखली, रा. गांधीनगर, चिखली याच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीच्या पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलिस निरीक्षक महेश भोसले यांच्या पथकाने पार पाडली.


राज्य सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत राबविल्या जाणार्‍या रोजगार हमी विहीर अनुदान योजनेच्या फायली ग्रामपंचायतींमार्फत चिखली पंचायत समितीत सादर झालेल्या आहेत. या विहिरी मंजूर करून देण्यासाठी काही सरपंच व त्यांचे पंटर तब्बल ६० ते ७० हजार रूपयांची मागणी गोरगरीब शेतकर्‍यांकडे करत असल्याची माहिती गोपनीयरित्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पंचायत समितीस्तरावर ही योजना पारदर्शकपणे राबविली जाणार असल्याचे प्रभारी बीडीओ आशीष पवार यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला सांगितले असले तरी, काही सरपंच व त्यांचे पंटर हे पैसे का मागत आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सरपंचांनादेखील ‘एसीबी’च्या सापळ्यात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालवले असल्याची गोपनीय माहिती हाती आली आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!