वाळूतस्करी करणार्या डंपरने युवकाला उडविले, युवक ठार; संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको!
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – चोरटी वाळू वाहतूक करणार्या भरधाव डंपरने २४ वर्षीय तरूणाचा बळी घेतल्याची दुर्देवी घटना लोणार-मंठा मार्गावरील अजिसपूर येथे घडली आहे. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता रोको करत, या भागातील वाळूतस्करी बंद करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे काहीकाळ हा मार्ग ठप्प झाला होता. सिराज आयूब शेख असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून, तो दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने त्याला उडवले होते.
सिराज शेख हा युवक आपल्या दुचाकीने लोणार-मंठा मार्गाने तळणीच्या दिशेने जात होता. मात्र पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्याला उडवले. अपघाताची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिराजला ग्रामस्थांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगरला हलविले जात असताना, त्याचा वाटेतच मृत्यू झाला. अपघातानंतर ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले होते. जोपर्यंत अवैध रेती वाहतूक करणारे वाहन पोलिस शोधत नाही, तोपर्यंत या युवकाचा मृतदेह घटनास्थळावरून उचलणार नाही, अशी भूमिका गावकर्यांनी घेतली होती. तब्बल साडेतीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे लोणार पोलिस ठाण्याचे ठाणेदार तसेच लोणारचे तहसीलदार यांनी घटनास्थळी घाव घेतली व रस्ता रोको आंदोलन करणार्या ग्रामस्थांची समजूत काढली. वाळूतस्करांवर कठोर कारवाईचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मोकळा करून दिला.