‘तुम्हारा मान रखेंगे’; शाहांनी एकनाथ शिंदेंना १३ जागा सोडल्या; पण काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागणार!
नवी दिल्ली (खास प्रतिनिधी) – महायुतीचे जागावाटप अखेर पूर्ण झाले असून, केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शाह यांचे मन वळविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. ‘तुम्हारा मान रखेंगे’, असे सांगत शाहांनी शिंदेंना १३ जागा सोडल्या; पण काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागतील, असे शिंदेंना सांगण्यात आले आहे. अहमदनगर (दक्षिण)मधून डॉ. सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून उन्मेष पाटील, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी या भाजपच्या पाच, तर शिंदे गटाच्या बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी अशा महाराष्ट्रातील एकूण १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात पक्षाच्या चिन्हावर लोकसभेच्या १३ जागा लढवणार आहे. त्याबदल्यात भाजप मुंबईतील सहापैकी पाच लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे गटातील सूत्रांनी दिली. अमित शाह यांच्यासमोर झालेल्या जागावाटपांत भाजप राज्यात ३१ जागा लढवणार असून, शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती, शिरूर आणि रायगड व्यतिरिक्त परभणी या चार जागा देण्यात आल्या आहेत. नगर दक्षिणमधून डॉ. सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे, जळगावमधून उन्मेष पाटील, बीडमधून प्रीतम मुंडे, सोलापूरमधून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी या भाजपच्या पाच, तर शिवसेनेकडून बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी अशा एकूण १२ विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शाह यांनी शिंदे यांना ‘तुम्हारा मान रखेंगे’ असे सांगितले असल्याचे हे सूत्र म्हणाले.
मुंबईत शाहांसोबत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सुरुवातीला १८ जागांची मागणी केली होती. अखंड शिवसेनेने २०१९ मध्ये जिंकलेल्या जागांचा यात समावेश होता. नंतर ते १५ पर्यंत खाली आले. शाहा यांनी शेवटी नकार दिला, आणि दिल्लीतील बैठकीत १३ जागांवर सहमती दर्शवली, असे या सूत्राचे म्हणणे आहे. सुरूवातीला शाह यांनी शिंदे यांना कमी जागांवर राजी करण्याचा प्रयत्न केला होता. अधिकच्या जागा हव्या असतील तर त्यांच्या खासदारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह रेटला होता. परंतु, मनासारखे जागावाटप होत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर शिंदे गटात निर्माण झाल्याने व तशी माहिती भाजपच्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्याने रिस्क नको म्हणून शाह हे दोन पाऊले मागे आल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गट उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपला देणार आहे. त्या बदल्यात शिंदे यांचा बालेकिल्ला असलेली ठाण्याची जागा त्यांना मिळेल, असेही या सूत्रांनी सांगितले.
————-