– लवकरच सुरू होणार ऑफलाईन व ऑनलाईन प्रशिक्षण सत्रे
– व्यवसाय सुरू करण्यासाठी इटर्नशीप; बँका, वित्तीय संस्थांच्या अर्थसहाय्यासाठी मिळणार सर्वतोपरी सहाय्य
पुणे – ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था, महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वतोपरी विकासासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेची स्थापना केलेली आहे. या संस्थेच्या स्वावलंबी नवउद्योजक बनविणेसाठी लघुउद्योग प्रशिक्षण योजनेला राज्य भरातून लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1725 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येऊन लवकरच ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्याला लवकरच हे नवे लघुउद्योजक मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
‘अमृत’ संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिक दुर्बल घटकांतील पात्र लाभार्थ्यांसाठी स्वावलंबी नवउद्योजक बनविणेसाठी लघुउद्योजक प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी हजारो अर्ज प्राप्त झाले असता, छाननीअंती 1725 उमेदवार पात्र ठरले आहेत. या पात्र उमेदवारांना लवकरच योजनेचा लाभ व प्रशिक्षण देण्यात येऊन लघुउद्योजक बनण्याची संधी प्राप्त होणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान इटर्नशीप, व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत सर्वंकष प्रशिक्षण, लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन बँकिंग व वित्तीय संस्थांमार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी सहाय्य व मार्गदर्शन, व्यवसाय प्रसिद्धीसाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण, प्रोजेक्ट रिपोर्ट, उद्यम नोंदणी, व प्रकल्प भेटी आदींद्वारे सक्षम लघुउद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट ‘अमृत’ने निर्धारित केलेले आहे. पहिल्या टप्प्यात 1725 लघुउद्योजक तयार केले जाणार असून, त्यातील कृषीआधारित लघुउद्योगांचे 190 लाभार्थी आहेत. पुढील काळात सुमारे ८ हजार लघुउद्योजक निर्माण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती ‘अमृत’च्यावतीने देण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.
खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना आहे. अशा घटकांतील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग, योजना, महामंडळे, उपक्रम यांच्याकडून लाभ मिळत नाही, असे उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी संबंधित उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील जातीचा असल्याचा पुरावा, कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांच्या खाली असावे, तसे सक्षम अधिकार्यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र हवे. शैक्षणिक अर्हता किमान बारावी उत्तीर्ण असावी, आधारकार्ड, पॅनकार्ड, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, अर्जकरतेवेळी जागेबाबतचा पुरावा आदी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात. अर्जप्रक्रिया ही ‘अमृत’च्या वेबसाईटवर (www.mahaamrut.org.in) ऑनलाईन किंवा ऑफलाईनही करता येते. अधिक माहितीसाठी ‘अमृत’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी, किंवा योजनेच्या अमलबजावणीसाठी नियुक्त ‘ध्रुव अॅकॅडमी’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही ‘अमृत’च्यावतीने करण्यात आलेले आहे.
—————-