BULDHANAHead linesMEHAKARSINDKHEDRAJAVidharbha

बुलढाणा जिल्हावासीयांनी ठरवलं, रविकांत तुपकरच आमचे खासदार!

– झोटिंगा येथील मेळाव्याला तुफान प्रतिसाद, जेसीबीने पुष्पवृष्टी करून गावकर्‍यांनी केले स्वागत
– जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – जिथे जावे तिथे नागरिकांचा ओसंडून वाहणारा प्रतिसाद मला दररोज लढण्याची नवी ऊर्जा देत आहे, हा उत्साह, वाढता प्रतिसाद आणि प्रेम पाहून अशी खात्री पटली आहे की, ही लोकसभेची निवडणूक माझी एकट्याची नसून ती खर्‍याअर्थाने लोकांची निवडणूक बनली आहे. आता गावोगावी वातावरण पेटले असून नागरिकांनीच आता ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील निर्धार मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, बुलढाणा जिल्हावासीयांनी रविकांत तुपकर हेच आमचे आता खासदार आहेत, असे एकमुखाने निक्षून सांगणे सुरू केले आहे. तुपकरांच्या विजयाची आता फक्त औपचारिकता उरली असल्याचे त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा काल, १३ मार्च रोजी सिंदखेडराजा तालुक्यात होती. यावेळी झोटिंगा येथे झालेल्या तुपकरांच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याला परिसरातील गावकर्‍यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला मोठी गर्दी केली होती. तुपकरांचे गावात आगमन होताच डिजे लावून आणि जेसीबीने पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावकर्‍यांनी संपूर्ण गावातून रविकांत तुपकरांची जंगी मिरवणूक काढली. या सर्वांचे हे प्रेम आणि ओसंडून वाहणारा उत्साह पाहून भारावून गेल्याची भावना तुपकरांनी यावेळी व्यक्त केली.


दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा गावातही रविकांत तुपकर यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रामदैवत वाघाळेश्वराची तुपकर पती-पत्नीच्याहस्ते महापूजा करण्यात आली होती. काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने तर तुपकरांना एक लाख रूपये मदत जाहीर केली.


त्याचबरोबर, अंढेरा येथील निर्धार मेळाव्यालाही गावकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मला सत्तेची आणि पदाची लालसा मुळीच नाही, परंतु कष्टकर्‍यांचा, शेतकर्‍यांचा, सर्वसामान्यांचा आवाजही सभागृहात पोहोचला पाहिजे. यासाठी शेतकरी, कष्टकरी व तरुणांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवित आहोत. त्यानंतर आता परिवर्तन निर्धार यात्रेनिमित्ताने गावागावात मिळणारा तुफान प्रतिसाद पाहता मला अशी खात्री पटली की, लोकसभेची निवडणूक माझी एकट्याची नसून ती खर्‍या अर्थाने लोकांची निवडणूक बनली आहे. आता गावोगावी वातावरण पेटले असून नागरिकांनीच आता ही निवडणूक हाती घेतली आहे, त्यामुळे परिवर्तन अटळ आहे, अशा भावना यावेळी रविकांत तुपकरांनी व्यक्त केल्या. सोयाबीन-कापसाला भाव मिळावा, पीकविमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासाठी विविध आंदोलने केली. गेल्या वर्षी आत्मदहनाच्या आंदोलनावेळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून पोलिसांनी लाठीमार केला आणि आम्हाला तुरुंगात टाकले. त्यावेळी झालेल्या वेदना आणि जखमा आता जनतेच्या प्रेमाने भरून निघाल्या आहेत. गेल्या २२ वर्षात मी शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावरची लढाई लढली आहे. या २२ वर्षात मी सत्ता, पैसे, पद जरी कमावले नसले तरी गावगाड्यातील जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद कमावले. जीवाभावाची लाखो माणसे कमावली, आणि हीच माझी खरी संपत्ती आहे, या संपत्तीच्या जोरावरच मी लोकसभेची निवडणूक लढत आहे, गावोगावी मिळणारा प्रचंड प्रतिसाद, सर्वसामान्यांचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता आता ही लढाई केवळ माझी एकट्याची उरली नाही तर जनतेने ही लढाई आता हाती घेतली आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. झोटिंगा येथील नागरिकांची गर्दी व उत्साह हा लोकसभेच्या निकालाची चुणूक दाखविणारा ठरला.

झोटिंगावासीयांनी केले तुपकरांचे भव्यदिव्य स्वागत!

रविकांत तुपकरांचे झोटींगा गावात आगमन होताच गावकर्‍यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. त्यानंतर डिजेच्या तालावर खुल्या गाडीतून तुपकरांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत त्यांच्यावर जेसीबीतून फुलांचा प्रचंड वर्षांव केला. तर दारोदारी मायमाऊल्यांनी औक्षण केले. यावेळी तरुणांचा व गावकर्‍यांचा प्रचंड जल्लोष बघायला मिळाला. रविकांत तुपकरांचे गावोगावी होणारे जंगी स्वागत व सभांना होणारी प्रचंड गर्दी बघता त्यांची जिल्हात लाट निर्माण झाली आहे.


मेहकर तालुक्यातही निर्धार परिवर्तन यात्रेचा झंझावात;
शेतकरी कष्टकर्‍यांचा आवाज झाला बुलंद!

रविकांत तुपकरांच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मेहकर तालुक्यात अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळाला. संपूर्ण तालुक्यात निर्धार परिवर्तन यात्रेचा धुमधडाका पाहायला मिळाला. शेतकरीपुत्राचा हा माहोल परिवर्तनाचा संदेश देणारा ठरला. तुपकर यांची निर्धार यात्रा मजल दरमजल करत ११ मार्च रोजी मेहकर तालुक्यात पोहोचली होती. तालुक्यातील छत्रपती शिवाजी नगर, पेनटाकळी, कळंबेश्वर, कासारखेड, सारशिव, हिवरा खुर्द, ब्रम्हपुरी, नांद्रा धांडे, कल्याणा, कंबरखेड, साब्रा, आंधृड, अंजनी बु. सोनाटी या गावांचा दौरा करून येथील नागरिकांशी रविकांत तुपकरांनी संवाद साधला. येथील सभांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मोठा प्रतिसाद दिला. सगळीकडे लोकांचा परिवर्तनासाठीचा असलेला उत्साह उर्जादायी आहे. या बळावरच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी यावेळी बोलतांना केले. वैयक्तिक रविकांत तुपकर यांना लोकसभेत पाठवणे हा उद्देश नसून महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकर्‍यांचा, कष्टकर्‍यांचा, तरुणांचा व सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत पोहचविण्यासाठी जिल्हाभरातील सर्व सामान्य जनता आता तन-मन-धनाने कामाला लागले आहे. मला कोणी गॉडफादर नाही, माझ्या पाठीमागे कोण्या राजकीय नेत्याची ताकद नाही, संपत्ती नाही, परंतु शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनता हीच माझी गॉडफादर आणि सर्वसामान्यांचे मिळत असलेले प्रचंड प्रेम व आशीर्वाद हीच माझी खरी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती पाहता जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत असल्याचा मला अभिमान वाटतो. आयुष्यात कधीच साहेब, दादा, भाऊ होणार नाही, मी तुमच्या सर्व सामान्यांचा रविकांत म्हणूनच कायम राहील. परिवर्तनाची लढाई आता सर्वसामान्यांनी आपल्या हातात घेतली आहे, जिल्हाभर परिवर्तनाचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. त्यामुळे आता यावेळी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रयत्न आणि परिश्रमाला निश्चितच यश येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.`जे करी गाव ते न करी राव’ त्याप्रमाणे आता एक नव्हे तर जिल्ह्यातील गावेच्या गावे परिवर्तनाचा निर्धार करून ठाम आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या आणि काहीही कांगावा केला. तरी आता परिवर्तन निश्चितच आहे, असा विश्वास देखील रविकांत तुपकरांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. यावेळी गणेश गारोळे, सहदेव लाड, कैलास उतपुरे, प्रफुल्ल देशमुख, महेश देशमुख, अनिल बोरकर, देवेंद्र आखाडे, सिद्धू बोरे, शिवाजी ढवळे, गोपाल सुरडकर, अरविंद दांदडे, ज्ञानेश्वर दांदडे, संदीप नालिंदे, राम अंभोरे, गणेश कष्टे, बाळू देवकर, गजानन म्हस्के, हनुमान वडतकर, राजेश दुनगु, सहदेव काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!