आंबेडकरांसोबतच्या बैठकीआधी शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक!
– शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांच्यात जागावाटपांबाबत आज निर्णायक बैठक
मुंबई (खास प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतले नाही तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे सर्वज्ञात असतानाही जागावाटपात काँग्रेस तडजोड करायला तयार नाही, अशी राजकीय चर्चा राजकीय वर्तुळातून पुढे आली असून, किमान सहा जागा मिळाल्या नाही तर आंबेडकर हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्यात उद्या (दि.६) जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीआधीच पवार व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्वाची बैठक पार पडली. ठाकरे यांनी आपल्या जागांची यादी पवारांकडे सुपूर्त केली असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये व्हावा यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करुन उद्या (दि.६) दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची पुन्हा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे ठिकाणी अद्याप निश्चित झाले नसले तरी शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओकवरच ही बैठक होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. ठाकरे यांनी आपली २३ लोकसभा मतदारसंघाची यादी पवारांना सुपूर्त केल्याचे सूत्राने सांगितले. या जागा ठाकरेंना हव्या आहेत. दरम्यान, उर्वरित २५ जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांनी कसे लढायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे-पवार यांच्या आजच्या चर्चेनंतर उद्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.
महायुतीतदेखील जागावाटपाचे त्रांगडे, अनेक जागांवर तीनही पक्षांचा दावा!
दरम्यान, महायुतीतदेखील जागावाटपाचे त्रांगडे निर्माण झाले आहे. आज अकोल्यात भाजपच्या कोर कमिटीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भातील सहाही जागा लढण्याचे निश्चित झाले असल्याचे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, जागावाटपासंदर्भात महायुतीत तीनही पक्षांनी अनेक मतदारसंघांवर दावा केलेला आहे. त्यात धाराशीव (उस्मानाबाद), परभणी, नाशिक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, माढा, रायगड, उत्तर पश्चिम मुंबई या जागांचा समावेश आहे. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपमध्ये वाद सुरु आहे. नाशिकच्या शिंदेंच्या जागेवरही भाजप इच्छुक आहे. सिंधुदुर्गात जागा शिंदे गटाची असली तरी भाजपचे नारायण राणे लढण्यासाठी इच्छुक आहेत. हिंगोलीत शिंदे गटाचे मराठवाड्यातले एकमेव खासदार आहेत. मात्र तिथेही भाजप पदाधिकार्यांनी जागा मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही शिंदे आणि भाजप यांच्यात वाद आहेत. बुलढाण्यात तर तीनही पक्षांनी दावा ठोकला आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी शिंदे गटाला ही जागा हवी आहे, तर अजित पवार गटानेही ही जागा राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी मागितली आहे. भाजपला ही जागा हवी आहे. माढ्यामध्येही भाजप आणि अजित पवार गटामध्ये लढण्यावरुन वाद आहे. कोकणात रायगडमध्येही तीनही पक्षांनी दावा केला असून, उत्तर पश्चिम मुंबईत भाजप आणि शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. एकूणच शिंदे गट २२ जागा लढण्यावर ठाम आहे. अजित पवार गटाला १० जागा पाहिजेत. तेव्हा आता अमित शहा हेच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतील, असे भाजपच्या सूत्राने सांगितले आहे.
१४ मार्चरोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता!
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १४ मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ प्रमाणेच यंदाही सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होण्याची शक्यता असून, १६ जून २०२४ रोजी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोगाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाणार आहे. पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू होईल.
—————