– शाळकरी विद्यार्थ्यांकडून खाण्यात आले कालबाह्य पदार्थ?
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यातील मलकापूर शहरातील स्टेशन रोडवरील खाद्य पदार्थ विक्रेत्याकडून आपल्या दुकानातील एक्सपायरी झालेला म्हणजेच कालबाह्य झालेला खराब खाद्य पदार्थ मलकापूर शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, शहरातील लहान वयोगटातील शाळकरी मुले-मुली या कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची तसेच शीतपेयाची चव चाखत असल्याचे समोर आले आहे. त्यातून या मुलांना विषबाधा किंवा पोटाचा गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर नगरपरिषद कारवाई करणार की नाही, असाही प्रश्न निर्माण झाला असून, अन्न व औषधी प्रशासन तर गाढ झोपेत दिसून येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मलकापूर शहरातील स्टेशन रोडवरील खाद्यपदार्थ विक्रेते आपला खराब झालेला शीतपेये, व इतर खाद्यपदार्थांचा माल नेहमीच असा सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणावर फेकून देत असतात. त्यामुळे पर्यावरण, नागरी आरोग्य यासह हे पदार्थ लहान मुले खात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका आणि विशेष म्हणजे भटकेप्राणी जसे कुत्रे, गायी-म्हशीदेखील हे पदार्थ खात असल्याने त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर मलकापूर नगरपरिषदेसह अन्न व औषधी प्रशासन विभागाने तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची गरज असताना, हे दोन्ही विभाग डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून गाढ झोपेत आहेत. त्यामुळे शहरवासीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या फेकलेल्या मालाची पाहणी केली असता, गोपाल नमकिन, बालाजी नमकीन, थंड पेय स्प्राईट, अमर घी, फंटाच्या बॉटल्स आढळून आल्या आहेत. सदर खाद्यपदार्थ व शीतपेये कालबाह्य झाल्याचे दिसून आले. हे शीतपेये व खाद्यपदार्थ उघड्यावर फेकले गेल्याने ते चिमुकल्या शाळकरी मुलांनी खाल्यास त्यांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अनेक दुकानदार कालबाह्य झालेला माल उघड्यावर फेकतात तेव्हा अन्न व औषधी प्रशासन विभाग व नगरपरिषद नेमके काय करते, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
—————-