– लोकसभेसाठी स्वराज्य शक्तीसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध होणार
बीड (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा धनंजय मुंडे या लोकसभा निवडणूक स्वराज्य शक्तीसेना या त्यांच्या पक्षाच्यावतीने बीड येथून लढणार असून, त्यानिमित्त महाशिवरात्रीच्या पर्वावर बीड येथे त्यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. ८ मार्चरोजी सायंकाळी ७ वाजता ही सभा छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार तथा ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे-खाडे या खासदार आहेत. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना, त्यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे-शर्मा यांनी केली आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबीयांना अडचणीत आणण्याची खेळी तर करूणा मुंडे या खेळत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहाता, त्यांचे व धनंजय मुंडे यांचे वाद आहेत, अशा परिस्थितीत त्या मुंडेभगिनींना आव्हान देत असल्याने राजकीय आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाशिवरात्रीनिमित्त दिनांक ८ मार्चरोजी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर करूणा मुंडे यांची जाहीर सभा होणार असून, यानिमित्त फराळ वाटप केले जाणार आहे. तसेच, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना साड्यांचेदेखील वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी कळवले आहे. याच जाहीर सभेत अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून, लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
————