Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

महाविकास आघाडीशी आंबेडकरांचे सूत्र जमेना?; ९ तारखेनंतर निर्णायक भूमिकेची शक्यता!

– महाआघाडीत १५ जागांचा तिढा; अकोलासह सोलापूर, अमरावतीची जागा आंबेडकरांना हवी!

मुंबई (खास प्रतिनिधी) – महाविकास आघाडीत जागावाटपावरून अद्यापही एकमत होण्यास तयार नसून, मागील लोकसभा निवडणुकीत एक जागा कशीबशी जिंकणार्‍या काँग्रेसने आपल्या जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याबाबत नकारात्मक सूर लावल्याने, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मानसिकता बनली असल्याची खात्रीशीर माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईतील फोर सिझन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीचे चार सत्र झाले तरी जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे पुढील बैठक ९ मार्चरोजी घेण्यावर एकमत होऊन आजची बैठक भोजनोत्तर मोडली. उद्या गुरूवारी काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणुगोपाल हे मुंबईत येत असून, त्यांच्याशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर नेते हे चर्चा करणार असून, राहुल गांधी यांच्या कानावर जागावाटपाची आज झालेली चर्चा टाकली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आंबेडकर यांची खासगीतही भेट घेऊन त्यांना काँग्रेसची अडचण सांगितली आहे. जागावाटपाबाबत सद्या महाविकास आघाडीत गंभीर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत १० जागांचा तर तीनही पक्षांत पाच जागांचा तिढा निर्माण झालेला आहे. त्यामुळे याप्रश्नी आता दिल्लीत बैठक झाल्यानंतरच राज्यातील जागावाटपाबाबत निर्णायक भूमिका घेतली जाईल, असेही सूत्राने स्पष्ट केले. अमरावती, सोलापूर या जागांवरून आंबेडकरांचा काँग्रेसशी तिढा निर्माण झालेला आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीला ‘बामसेफ’चे वामन मेश्राम हेदेखील हजर होते. त्यांनी विनाशर्त महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, बैठकीत आज काहीही एकमत होत नसल्याने प्रकाश आंबेडकर हे काही तासांतच बैठकीतून बाहेर पडले होते. हॉटेलबाहेर त्यांनी चेहर्‍यावर स्मीतहास्य दाखवून बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत दिले असले तरी, महाविकास आघाडीतील बेबनाव व जागावाटपाबाबत घेतली जात असलेली अडेलतट्टू भूमिका यामुळे ते कमालीचे नाराज असल्याचे विश्वासनीय सूत्राने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होऊ शकते, आणि जागावाटपाचे चर्चेचे गुर्‍हाळ अद्याप सुरूच आहे. त्यामुळे ९ तारखेनंतर प्रकाश आंबेडकर हे आपला निर्णय घेतील, अशी शक्यताही या खात्रीशीर सूत्राने व्यक्त केली आहे. आंबेडकर हे स्वतंत्र किंवा शिवसेनेसोबत युतीकरून लढतील, असेच संकेत तूर्ततरी प्राप्त झालेले आहेत.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!