ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यासह दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
बुलढाणा/चिखली (महेंद्र हिवाळे) – पंचायत समितीस्तरावर व घनकचर्याच्या केलेल्या कामाचे तीन लाख ८८ हजार २५४ रूपयांचे बिल काढण्यासाठी कार्यपूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता किरण केसापुरे याच्यासह कंत्राटी कर्मचारी गजानन इप्पर, खासगी व्यक्ती राजेश जायभाये यांना लाच स्वीकारताना ५ मार्चरोजी जालना- मेहकर रोडवरील सावखेड तेजन फाट्यावर रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
सविस्तर असे, की या घटनेतील तक्रारदार यांनी १ मार्चरोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली, की स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या सांडपाणी व घनकचर्याचे कामाची देखरेख तसेच बिलांचे इतर प्रक्रियेबाबत कामे पाहत असून, ग्रामपंचायतस्तरावर सांडपाणी व घनकचर्याचे केलेल्या कामाचे तीन लाख ८८ हजार २५४ रूपयांचे बिल काढण्यासाठी उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, चिखली, प्रभार सिंदखेडराजा यांच्या कार्यपूर्णत्वाचा दाखला आवश्यक असून, सदर दाखला देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी गजानन इप्पर यांनी स्वतः करिता २००० रुपये व उपअभियंता चव्हाण तसेच शाखा अभियंता केसापुरे यांचेकरिता २० हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीवरुन १ मार्चरोजी गजानन इप्पर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना स्वतःकरिता २००० रुपये व उपविभागीय अभियंता चव्हाण तसेच शाखा अभियंता केसापुरे यांचेकरिता तडजोडीअंती १५ हजार रुपये असे एकूण १७ हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच खासगी इसम राजेश जायभाये यांनी तक्रारदार यांना कंत्राटी कर्मचारी गजानन इप्पर यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. तसेच ४ मार्चरोजी लोकसेवक केसापुरे, शाखा अभियंता यांची लाच मागणी संबंधाने पडताळणी केली असता, लोकसेवक केसापुरे यांनी तडजोडीअंती १२ हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम कंत्राटी कर्मचारी गजानन इप्पर यांच्याकडे देण्याचे सांगितले. त्यावरुन ५ मार्चरोजी आयोजित सापळा कारवाईदरम्यान कंत्राटी कर्मचारी गजानन इप्पर यांनी तक्रारदार यांच्याकडून पंच क्र.१ यांच्यासमक्ष १४ हजार रुपये स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यावरुन आरोपी लोकसेवक किरण केसापुरे, शाखा अभियंता, वर्ग २, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, चिखली / प्रभार सिंदखेडराजा, आरोपी लोकसेवक गजानन आबाराव इप्पर, कंत्राटी क्षेत्र पर्यवेक्षक, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सिंदखेडराजा व खासगी इसम राजेश तुकाराम जायभाये, रा. पांगरखेड ता. सिंदखेडराजा यांच्याविरुध्द पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे कलम ७, ६, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही मार्गदर्शक मारोती जगताप पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन अमरावती, अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अँन्टी करप्शन ब्युरो अमरावती, पथकातील श्रीमती शीतल घोगरे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा महेश भोसले, पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा, एएसआय शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण वैरागी, पोलिस नाईक विनोद लोखंडे, पोकॉ रंजित व्यवहारे, गौरव खत्री, चानापोकॉ. नितीन शेटे यांनी पार पाडली.