LONARVidharbha

आपले एक मत शेतकरी व काळ्यामातीच्या सेवेसाठी द्या – अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर

– तब्येत बिघडल्याने रविकांत तुपकर आले नाहीत; पण शर्वरीताईंनी सभा अन लोकांची मने जिंकून घेतली!

वडगाव तेजन, ता. लोणार (विनोद पाटील तेजनकर) – लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व स्वतःच्या जीवाची परवा न करता सतत आंदोलन करून शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत. आपण सर्वांनी त्यांना एक मत व मदतीसाठी एक नोट देऊन सहकार्य करावे. आपले एक मत या रात्रंदिवस कबाडकष्ट करून जगणार्‍या शेतकर्‍यांसाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, तसेच या काळ्या मातीच्या म्हणजेच काळ्या आईच्या सेवेसाठी द्या, असे विनम्र आवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी तसेच जिल्ह्यातील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर यांनी केले. येथे झालेल्या निर्धार सभेच्यानिमित्ताने त्यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी शर्वरीताईंच्या भाषणाने शेतकरी माता-भगिनी ढसाढसा रडत असल्याचे दिसून आल्याने सभेचे वातावरण प्रचंड भावूक झाले होते. खरे तर तब्येत बिघडल्याने ऐनवेळी रविकांत तुपकर हे सभेला येऊ शकले नाहीत. परंतु, शर्वरीताईंच्या भाषणाने ही सभा त्यांनी जिंकलीच, पण माताभगिनींसह शेतकरीवर्गाचे मनेदेखील जिंकली. रविभाऊंच्या सभेपेक्षा शर्वरीताईंची सभा चांगली झाली, अशी प्रतिक्रिया या परिसरातील शेतकरीवर्ग दुसर्‍या दिवशी व्यक्त करताना दिसून आला.

शेतकर्‍यांचा संघर्षयोद्धा असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर या आधुनिक सावित्री आहेत. त्या पाठीशी आहेत म्हणूनच रविकांत तुपकर हे शेतकर्‍यांसाठी बलाढ्य सत्तेविरोधात रणशिंग फुंकू शकले, व शेतकर्‍यांच्या पदरात न्याय, आधार व कोट्यवधी रूपयांची सरकारी मदत टाकू शकले. वडगाव तेजन येथील जाहीरसभेत अ‍ॅड. शर्वरीताई तुपकरांनी पती तथा शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाबाबतची माहिती देत असताना कुटुंब व घराची होणारी फरफट व भावनिक ओढाताण आपल्या भाषणातून विषद करत रविकांत तुपकरांचे शेतकर्‍यांसाठीचे योगदान लोकांसमोर मांडले. पाच वर्षाचा मुलगा व बारा वर्षाची मुलगी व सर्वच परिवाराचा विचार न करता, रविकांत तुपकरांनी जेव्हा अंगावर डिझेल ओतून घेतले, त्या वेळेचा व दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी भरल्या ताटावरून पतीला पोलिसांनी मुलाबाळांच्या समोर उचलून नेल्याचा प्रसंग सांगत असताना उपस्थित सर्वच महिला व पुरुषांच्या अंगावर काटे येऊन डोळ्यातून अश्रू वाहायला लागले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी वडगाव तेजन येथील उपस्थित सर्व जनसमुदायांनी मात्र मतदानातून व वर्गणी करून पैशाची भरगच्च मदत करणार असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट पहावयास मिळाला. याप्रसंगी शर्वरीताईंना विद्यमान खासदारांचा नामोल्लेख टाळून त्यांचा सडकून समाचार घेतला.
वडगाव तेजन येथे शेतकरी, युवकांनी रविकांत तुपकर यांची सभा आयोजित केली होती. परंतु रविकांत तुपकरांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून अ‍ॅड. शर्वरीताई तुपकर या आल्या होत्या. परंतु रविकांत तुपकरांचे येणे रद्द झाल्यामुळे सभा होणार की नाही याची शंका निर्माण झाली असताना, अ‍ॅड. शर्वरीताईंच्या रात्री उशिरा सुरू झालेल्या सभेला वडगाव तेजन येथे शेकडो शेतकरी, ग्रामस्थ, युवावर्ग व महिला भगिनींनी भरगच्च गर्दी केली होती. शेतकरी युवानेते सहदेव लाड यांच्यासह काही पदाधिकार्‍यांनी व गावकर्‍यांतर्पेâ भगवान चेके यांनी केलेल्या भाषणामध्येसुद्धा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. अ‍ॅड. सौ. शर्वरीताई तुपकर यांचा सौ.नीता विकास तेजनकर व अन्य बर्‍याच गावकर्‍यांनी आणि आयोजकांनी केलेल्या सत्काराने भारावून गेले असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू असलेल्या सभेमधून मात्र सभा संपेपर्यंत कुणीही जागचे हललेसुद्धा नाही तर उलट रविकांत तुपकरांची सभा लवकरच घेणार असल्याचे गावकर्‍यांनी व आयोजकांनी सांगितले.


निर्धार यात्रेच्या माध्यमातून लोणार तालुक्यातील चिखला (काकड), हत्ता, तांबोळा, लोणार शहर, देऊळगाव कुंडपाळ, चिंचोली सांगळे, पार्डा दराडे, येवती, वझर आघाव व वडगाव तेजन या गावांना भेटी देत शर्वरीताई तुपकर यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला. वडगाव तेजन येथे झालेल्या सभेला गावकर्‍यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दौर्‍यात नसतांनाही अगदी वेळेवर वझर आघाव येथेही जोरदार सभा झाली.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!