Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

हरभरा सोडून इतर पिकांचेच पंचनामे होत असल्याने शेतकरी संघटनांसह शेतकरी खवळले!

– पंचनामे टाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे हरभरा पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नोव्हेंबरमध्ये झालेल्या हरभरा नुकसानीची रक्कम मंजूर झाल्याचे कारण समोर करीत हरभरा सोडून इतर पिकांचे सर्वेक्षण सुरु असल्याची बाब समोर आली असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, आम्ही दुबार पेरणी कलेल्या हरभरा पिकाचेसुद्धा पंचनामे करा, अशी मागणी शेतकर्‍यांसह शेतकरी संघटनेचे देविदास कणखर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, भगवान मोरे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चिखली तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे, वरखेड, घानमोड, मानमोड, टाकरखेड, ऐनखेड, करनखेड, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, मेरा यासह परिसरामध्ये वादळीवार्‍यासह, पाऊस व गारपीट होऊन हरभरा, गहू, ज्वारी, करडी, कांदा यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असतांना हरभरा पिकांचे पंचनामे न करता इतर पिकांचेच पंचनामे कृषी विभाग महसूल विभागाकडून होत असल्याने मागील वर्षीचा ओला दुष्काळ व या वर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला आहे. यामुळे शेतकर्‍यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे. त्यातच रब्बी पेरणी केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाल्याने त्यावेळीसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातच मागील आठवड्यात दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टी, गारपीट व वादळीवार्‍यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे नेटशेडसह त्यातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे व सरकारच्या शेतीविषयी असलेल्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. असे असतांना शासन मात्र कागदोपत्री पंचनामे करण्याचे आदेश देत आहे. परंतु हरभरा पीक वगळून पंचनामे होत असल्याची ओरड शेतकर्‍यांनमधून होत असून यासाठी नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे कारण समोर केले जात आहे. परंतु शेतकर्‍यांनी तेव्हा नुकसान झालेले पीक मोडून दुबार पेरणी केली होती. तर आता नव्याने संकट शेतकर्‍यांवर ओढावल्याने
प्रशासनाकडून कुठलीही उडवाउडवीचे उत्तरे न देता चिखली तालुक्यातील रब्बीच्या हरभरा, गहू, कांदा, करडी, ज्वारी, भाजी पाल्यासह इतर पिकांचे पंचनामे करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढलेला आहे, त्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम त्वरित टाकण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागण्यांची ८ दिवसात पूर्तता होऊन न्याय न मिळाल्यास शेतकर्‍यांसह तहसील कार्यालय तसेच कृषी विभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. यावेळी देविदास कणखर, विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, विलास मुजमुले, मुरलीधर येवले, नवलसिंग मोरे, प्रकाश आंभोरे, भारत खंडागळे, प्रकाश घुबे, शिवाजी गालट, संतोष कुटे, विष्णू कुटे, संजय वाघ, दिलीप गाडेकर, विशाल चिंचोले, प्रमोद वाघ, परमेश्वर जगताप यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निर्धार परिवर्तन अभियानाला चिखली तालुक्यात दणक्यात सुरुवात!

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या निर्धार परिवर्तन अभियानाला जिल्ह्यात जोरदार सुरूवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व रविकांतभाऊंचे समर्थक गावोगावी जावून थेट लोकांशी संवाद साधत आहेत. त्याचप्रमाणे सद्या शेतीचे कामे सुरु असल्याने शेतकरी कामात गुंतले असल्याने बांधावर जात शेतकर्‍यांशी संवाद साधला जात आहे. शेतकर्‍यांच्या अडीअडचणी बांधावर, घरोघरी जावून जाणून घेण्याबरोबरच रविकांत तुपकर यांनी गेल्या २१ वर्षांत केलेल्या कामाचा आढावा लोकांसमोर मांडत आहेत. या अभियानाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे रविकांतभाऊ तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांवरील प्रेम व विश्वास यानिमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!