Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

दिल्ली दरबारांतील बैठकांत अजितदादा, शिंदेंच्या पदरी निराशाच; जागावाटपाचे घोडे अडले, शाहांपुढे जाता येईना!

– बुलढाण्याची जागा भाजपला सोडावी लागणार, किंवा उमेदवार बदलावा लागणार; खा. जाधवांच्या उमेदवारीवर टांगती तलवार!

नवी दिल्ली/ बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटायला तयार नसून, भाजपकडून मिळत असलेल्या अवघ्या ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे अध्यक्ष अजितदादा पवार हे कमालीचे नाराज आहेत. दादांना किमान सहा जागा हव्या आहेत. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदरातदेखील ९ जागांपेक्षा जास्त जागा पडत नसल्याने त्यांच्या गटातही संघर्ष निर्माण झालेला आहे. दोन जागांवर त्यांचे उमेदवार हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात, असे असले तरी विद्यमान १३ पैकी ११ जागाच शिंदेंच्या पदरात पडणार असून, बुलढाणा, वाशिम या विदर्भातील मतदारसंघातून उमेदवार बदलून देण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आग्रही आहे. बुलढाणा हा मतदारसंघ भाजपने मागितला असून, तेथे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह शिंदे यांनी धरला असून, त्यांना विरोधच असेल तर मात्र त्यांच्याऐवजी आमदार संजय गायकवाड यांचे नाव शिंदे यांनी सूचविले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्राने दिली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात खा. जाधव यांचा स्ट्राईक रेट (निवडून येण्याची शक्यता) ही ‘डेंजरझोन’मध्ये असल्याची खात्रीशीर माहिती आहे. दरम्यान, बुलढाणा मतदारसंघातून सर्वाधिक स्ट्राईक रेट हा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा असून, त्यांच्या विजयाची शक्यता ही ६९ टक्क्यांवर पोहोचली असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने या सर्वेक्षणाच्या हवाल्याने दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील महायुतीच्या जागावाटपांबाबत नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठकांवर बैठका होत आहे. काल रात्रीही अडिच वाजेपर्यंत बैठक सुरू होती. आजही दोनवेळा हे नेते भेटले. परंतु, या जागावाटपांबाबत एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे समाधान होऊ शकले नाही. अमित शाह यांनी शिंदे व पवार यांच्याशी वेगवेगळी बैठक घेतली, व जागावाटपांबाबत भाजपचा निर्णय त्यांना सांगितला. या बैठकीबाबत माहिती देताना खास सूत्राने सांगितले, की भाजपने ३२ जागा मागितल्या असून, काही जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे भाजपच्याच चिन्हावर लढणार आहेत. म्हणजे, शिवसेना (शिंदे गट) ११ व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चार जागांवर लढतील, अशी चर्चा झाली आहे. काल रात्री अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीपासून शाह यांच्याकडून पवार व शिंदे यांना हाच आकडा दिल्या जात आहे, तर आणखी काही जागा देण्यासाठी हे दोघे नेते शाह यांची समजूत काढत होते. जर कमी जागांवर लढलोत तर कार्यकर्त्यांना उत्तर देणे अवघड होईल, असे अजित पवार यांनी तर आम्हाला कमी जागा मिळाल्या तर आमच्यासोबत आलेले काहीजण हे परत उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात, असे एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना समजावून सांगितले आहे. परंतु, शाह हे त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, असे सूत्राने स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाला ठाणे, दक्षिण मुंबई, रायगड आणि बुलढाणा या जागा हव्या आहेत. यातील रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार असून, बाकीच्या जागांवर शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे या जागांवरून सद्या शिंदे व पवार यांची भाजपने चांगलीच कोंडी केली आहे.


खा. जाधवांच्या उमेदवारीवर टांगती तलवार?

अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत भाजपच्या सर्वेक्षणात स्ट्राईक रेट कमी असलेल्या बुलढाणा लोकसभेची शिंदे गटाचे खा. प्रतापराव जाधव यांची जागा भाजपाला द्या, अथवा उमेदवार बदला, असे फर्मान अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोड़ल्याची विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे प्रचारासाठी जोरदार मैदानात उतरलेले खा. प्रतापराव जाधव यांच्यापुढे मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. तेलही गेले तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी त्यांची अवस्था बनत चालली आहे. खा. जाधव यांच्याऐवजी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड़ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पड़ून शकते, अथवा घासाघाशीत ऐनवेळी भाजपला ही जागा मिळाल्यास चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या भाजपच्या उमेदवार राहू शकतात. कारण, भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांचाच स्ट्राईकरेट हा सर्वाधिक आलेला असून, रविकांत तुपकर यांच्यानंतर त्या द्वितीय क्रमांकावर असल्याचे सूत्राने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवड़णुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, जागावाटपांबाबत वाढत चाललेला गुंता सैल करण्याच्या कामात वरिष्ठ नेते गुंतलेले आहेत. वरकरणी सर्व ऑलवेल असल्याचे दाखवले जात असले तरी गुंता वाढत असल्याने आता दिल्ली दरबारी खेटे घ्यावे लागत आहेत. महायुतीतही काही जागावरून घोड़े अड़ल्याची राजकीय सूत्रांची माहिती आहे. वाशिम, बुलढाणा या जागांसह चार ते पाच जागांवर गुंता आणखीच गुंतत चालला आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात या मतदारसंघातील खासदारांच्या कामाचा स्ट्राईक रेट कमी असल्याचे दिसून आलेले आहे. या शिवाय, अ‍ॅन्टीइन्कम्बशीचाही फटका काही ठिकाणी बसू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्रातून ४४ प्लसची तड़जोड़ करण्यासाठी भाजप सर्वशक्तिनीशी कामाला लागले आहे. त्यादृष्टीने जास्तीत जास्त खासदार शक्यतो भाजपच्या उमेदवारीवर निवड़ून आणण्याची व्यूव्हरचना भाजपकड़ून पध्दतशीरपणे आखली जात आहे. म्हणतात ना सोनाराच्या हाताने कान टोचले की दुखले तरी हसून सहन केल्या जाते, त्याप्रमाणे राज्यातील काही जागांवरील गुंता सोडविण्यासाठी थेट दिल्ली दरबारी अमित शाह व जे.पी. नड्डा यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस व अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची बैठक काल व आज पार पडली आहे. जागावाटपांवरून चांगलीच घासाघीस झाल्याची माहिती आहे. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे खासदार असलेले प्रतापराव जाधव यांच्याऐवजी उमेदवार बदला नाही तर सदर जागा भाजपला सोड़ा, असे फर्मान यावेळी अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोड़ल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. खा. जाधव सलग तीनदा खासदार राहिले त्यामुळे अ‍ॅन्टीइन्कम्बशीचा फटका बसू शकतो, शिवाय जनमतही त्यांच्या बाजूने नाही, अशीही भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले. असे झाले तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड़ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पड़ून शकते. घासागशीत बुलढाण्याची जागा भाजपनेच मिळवल्यास या जागेवर भाजपकडून मात्र आ. श्वेताताई महाले यांचे नाव पुढे आलेले आहे. याबाबत उद्या-परवापर्यंत सोक्षमोक्ष लागणार असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!