LONARVidharbha

बिबी ग्रामीण रुग्णालयात अखेर वैद्यकीय अधिकारी रुजू!

बिबी (ऋषी दंदाले) – बिबी येथील ग्रामीण रूग्णालयातील गलथान कारभाराबद्दल ब्रेकिंग महाराष्ट्रने राज्यभर सडेतोड आवाज उठविला होता, तसेच याप्रश्नी सरकारचेही लक्ष वेधून घेतले होते. तसेच बिबी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता. शिवाय, जनमतदेखील संतप्त होते. त्यामुळे अखेर या ग्रामीण रूग्णालयाला वैद्यकीय अधिकारी मिळाले असून, ते आता रूजू झाले आहेत.

लोणार तालुक्यातील बिबी हे महत्वाचे गाव असून, गावांमध्ये दररोज खेड्यापाड्यामधून हजारो लोकांची ये जा सुरू असते. या गावात पोलीस स्टेशन, बँक, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, आठवडी बाजार, कृषी उत्पन्न उपबाजार समिती, अनेक साहित्यांच्या बाजारपेठा असून, गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजार इतकी आहे. सोबतच छत्रपती संभाजीनगर – नागपूर महामार्ग या गावातून गेला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांची या गावात वर्दळ असते. येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने नागरिकांची व रुग्णांची मोठी हेळसांड होत होती. काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक मोठी घटना घडली होती, सोमठाणा या गावातील भाविकांनी एकादशी दिवशी भगर खाल्ल्याने ५०० जणांना विषबाधा झाली होती. या रूग्णांची हेळसांड ब्रेकिंग महाराष्ट्रने राज्यभरात चव्हाट्यावर आणल्याने याप्रश्नी उच्च न्यायालयानेदेखील दखल घेतली होती व राज्य सरकारला विचारणा केली होती. तसेच, या ग्रामीण रुग्णालयात एकही एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब लक्षात आल्याने गावाचे सरपंचपुत्र दीपक गुलमोहर, त्यांचे सहकारी कैलास मोरे व अमोल मुळे आणि ग्रामपंचायत कार्यालयाने अनेकदा जिल्हा शल्यचिकित्सक अधिकार्‍यांना कळवूनही त्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवल्या जायची. मात्र बिबी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा देताच तात्काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कुहिटे यांना जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने बिबी ग्रामीण रुग्णालयात रुजू केले आहे. त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या संवादानुसार लवकरच पुन्हा एक वैद्यकीय अधिकारी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सोबतच ग्रामीण रुग्णालयात गरजेच्या वस्तू पुरवठा करणार असल्याचेदेखील यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनातील नमूद रूग्णालयातील अनागोंदी कारभाराबद्दल चौकशी करून कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, एक्स-रे मशीन नियमित चालू ठेवावी, रक्त लघवी तपासणी मशीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी, दंत विभागातील अपुर्‍या साहित्याची पूर्तता करावी, इ.सी.जी. मशीन नियमित रोलपट्टीसह चालू असावी. क्लार्क, बाबू ,कर्मचारी, आधिकारी, यांनी नियमित हजर राहावे. अशा मागण्या केल्या होत्या. या संपूर्ण मागण्या आरोग्य विभागाने मंजूर केल्याने बिबी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!