भगवानगडावरील संत ज्ञानेश्वर मंदीर लोकार्पण सोहळ्याचे पंतप्रधान, सरसंघचालकांना निमंत्रण
नगर/श्रीक्षेत्र भगवानगड (बाळासाहेब खेडकर) – राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या व शेतकर्यांच्या देणगीतून सुमारे २६ कोटी रुपये खर्चाचे राज्यातील एकमेव असे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर भगवानगडावर बांधले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे, अशी माहिती भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील सराला बेट येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ग्रामविकास गतिविधिअंतर्गत अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले. देशातील विविध भागातून ३५० अभ्यासक प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित होते. भारतीय संस्कृती, धर्मस्थळे, आदींबाबत देशबांधवांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, त्या चळवळीचा उपयोग धार्मिक चळवळीत परिणामकारकरीत्या वाढावा, यासाठी प्रमुख स्थळांवरील संत-महंत आदींना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. पाथर्डी तालुक्यातून भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ.शास्त्री यांनी लिहिलेल्या हरिपाठ यावरील पुस्तकासह त्यांनी लिहिलेल्या अन्य धार्मिक ग्रंथांची भेट सरसंघचालक डॉ. भागवत यांना दिली. त्यांनी भगवानगडाचे कार्य इतिहास व पुढील आराखडा याबाबत माहिती जाणून घेतली. संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण दगडी काम, अति भव्य मंदिर पुढील वर्षी पूर्ण होईल. गडाचा सुवर्ण महोत्सव असल्याने त्यावर्षी लोकार्पण सोहळा होऊन देशातील प्रमुख साधु-संत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर असा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार असून, डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती डॉ.शास्त्री यांनी दिली. डॉ. शास्त्री म्हणाले, की भगवान गडाच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत अशाप्रकारे सर्व सोयीने युक्त अध्यायावत असे स्पर्धा परीक्षा केंद्र, वारकरी प्रशिक्षण संस्था, आध्यात्मिक शिक्षण देणारे विद्यालय चालवले जाते. राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या कष्टाच्या पैशातून चालणार्या उपक्रमांमध्ये परिसरातील गावांच्या सहकार्याने अहोरात्र मोफत महाप्रसादाला सुरू आहे. गड व परिसराला भेट देणार्या भाविकांबरोबरच पर्यटकांची संख्या वाढत असून, दर एकादशीला भाविकांची मोठी गर्दी येथे होते. भगवानबाबांनी व्यसनमुक्ती, शिक्षण, प्रसार, वारकरी संप्रदाय बरोबरच निसर्ग संगोपनासाठी कार्य केले. उच्चकोटीचे साधक म्हणून त्यांचा राज्याला परिचय आहे. भगवानगड भक्ती,शक्ती व सेवेचे प्रतीक असल्याने आवर्जून भेट देण्याबाबतचे निमंत्रण डॉ. भागवत यांनी स्वीकारले. भगवानगडाला भेट द्यायला व बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. यापूर्वी नाशिक येथे महंत डॉ.नामदेव शास्त्री व पंतप्रधान मोदींची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनीही लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले. सुवर्ण महोत्सव वर्षाच्या दृष्टीने गडावर वेगाने विकास कामे सुरू असून, धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून राज्यात गडाचा बोलबाला वाढेल, असा विश्वास भाविकांकडून व्यक्त होत आहे.