कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी केले; आता गुणवत्तापूर्ण शिक्षणही द्या!
– शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली असताना कॉपीमुक्त अभियानाने काय साध्य होणार?
चिखली/बुलढाणा (कैलास आंधळे) – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान दरवर्षी राबवले जाते, परंतु कॉप्यांचा सुळसुळाट हा पहायला मिळतोच. यंदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवले आणि तांत्रिक साधनांचा वापर करून ते यशस्वीही केले आहे. परंतु, कॉपीमुक्त अभियान यशस्वी केले तसे आता शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे शिवधनुष्यही सीईओ नरवाडे यांनी उचलावे, अशी अपेक्षा पालकवर्गांनी व्यक्त केली आहे. नरवाडे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेविषयी ते चांगलेच परिचित आहे. त्यांचे स्वतःचे शिक्षण जिल्ह्याबाहेर झाले म्हणून ते आयएएस होऊ शकलेत. आता तसे दर्जेदार शिक्षण जिल्ह्यातील मुला-मुलींना देण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करावा, अशी सूचनाही पालकांनी केली आहे. संपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली असताना, मुलांना शिकवलेच गेले नसताना, कॉपीमुक्त अभियान राबवून सीईओंनी काय साधले? असा सवालही काही पालकवर्ग करत आहेत. यंदा दहावी व बारावीच्या निकालाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याचा अंदाजही पालकांतून व्यक्त केला जात आहे.
देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कंबर कसली आहे. यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अन् चुकीला माफी नाही, असा सज्जड इशारा त्यांनी दिला होता. कॉपी रोखण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच ऑनलाईन संनियंत्रणाचा अभिनव प्रयोग करण्यात आला. परीक्षाकाळात १० वी व १२ वीच्या परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘कॉपीमुक्ती अभियान’ त्यांनी आतापर्यंत तरी यशस्वीपणे राबवले आहे. हे अभियान ज्या नियमांच्या जोरावर राबविले गेल्याचे दिसून येते, त्यात पोलिस बंदोबस्तावर भर देण्यात आला, परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या परिघात परीक्षाप्रक्रियेशी संबंध नसणार्या व्यक्तींना प्रवेश नाकारले गेले, अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येऊन तेथे अत्याधुनिक संपर्क प्रणाली वापरली गेली. कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आल्याने वातावरण टाईट राहिले, परीक्षा केंद्राच्या ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवली गेलीत, त्यामुळे आतापर्यंत तरी कुठे परीक्षेत कॉपीचा प्रकार निदर्शनास आला नाही.
जिल्ह्यात ११३ केंद्रावरून ३२ हजार १८३ विद्यार्थी बारावी, तर १५३ केंद्रांवरून ३९ हजार ६८४ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. भरारी आणि बैठे पथकांवर या परीक्षेच्या काळात पहिल्यांदाच एवढा मोठा दबाव दिसून आला आहे, ही एक चांगली बाब ठरली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या वेळीच प्रश्नपत्रिका दिल्या जात असल्याने पेपर फुटाचा प्रकार यावेळेस घडलेला नाही. मागील वर्षी लोणार तालुक्यातील घटनेने जिल्ह्याचे नाव चांगलेच गाजले होते. कॉपीमुक्त परीक्षा हा स्तुत्य उपक्रम असला तरी, ढासाळलेल्या गुणवत्तेच्या पृष्ठभूमीवर पालकांना हा निर्णय तितकासा रूचलेला नाही. झेडपी सीईओंनी आधी गुणवत्ता सुधारावी, नंतर कॉप्या बंद कराव्यात, असे पालक बोलत आहेत. दहावी, बारावीच्या मुलांना शाळेत शिकवलेच गेले नसेल तर त्यांनी परीक्षेत काय लिहायचे, असा संतप्त सवाल पालक करताना दिसत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात मुले-मुली नापास होणार असल्याने विद्यार्थी व पालक दोघेही चांगलेच धास्तावलेले आहेत. नवीन आणि त्यातही तरूण अधिकारी आला की तो असे प्रसिद्धीलोलुप निर्णय घेतो, आणि त्यात मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होते, अशाही प्रतिक्रिया ग्रामीण भागातील पालकांतून उमटत आहेत.
सीईओ विशाल नरवाडेंनी ‘हेडलाईन’ व्यापली; पण पालकांची नाराजी ओढावली!
वास्तविक पाहाता, अलीकडच्या काळात दहावी-बारावीच्या परीक्षांना पूर्वीसारखे महत्त्व राहिलेले नाही. या परीक्षांचा उपयोग केवळ पुढच्या वर्गात प्रवेश मिळवण्याइतपतच राहिला आहे. कारण अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश हे नीट, जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांवर आधारित असतात. यात बारावीच्या गुणांना काही किंमत राहत नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार तर मूल्यमापन प्रणालीद्वारे परीक्षा होणार आहेत. अर्थात याची सुरुवात पुढील वर्षापासून होणार असली तरी अद्याप याबद्दल पुरेशी स्पष्टता नाही. त्याचा निश्चित आराखडा एनईपी-२०२० म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अजून तरी नमूद केला गेलेला नाही. परीक्षा कॉपीमुक्त झाल्यास निकालाचा आलेख ढासळण्याची भीती शिक्षक आणि संस्थाचालक, बोर्ड आणि शिक्षण खात्याला वाटते. कॉपी रोखण्यासाठीचे सोपे उपाय प्रत्यक्ष शिक्षण सचिव, बोर्डाचे अध्यक्ष, विभागीय सचिव आणि शिक्षणमंत्री यांना सुचवूनदेखील त्याला केराची टोपली दाखविली जाते. कॉपी होतच नाही, असे भासविले जाते त्यामुळे उपाययोजना आपसूकच निकालात निघतात. परंतु, बुलढाणा जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान फारच गांभिर्याने घेऊन सीईओ विशाल नरवाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांची हेडलाईन व्यापली असली तरी, त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांतून मात्र त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर तीव्र असल्याचेच दिसून येत आहे.
————–