Breaking newsHead linesMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPoliticsPuneWorld update

भाजपच्या कार्यकर्त्यांची पुण्यात गुंडगिरी; ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला; गाडीच्या काचा फोडल्या!

– पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तरीही वागळे यांच्यावर हल्ला; अजित पवारांकडून कारवाईचे आदेश
– जीवंत असेपर्यंत लोकशाहीसाठी लढत राहील – निखिल वागळे

पुणे (खास प्रतिनिधी) – तब्बल चार दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड सवाल करणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात कडेकोट पोलिस बंदोबस्तात प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांच्या गाडीवर भाजपच्या गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, शाईफेक करून हा हल्ला केला. डेक्कन भागातील खंडोजीबाबा खोपडे चौकात त्यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. वागळे यांची गाडी पोलिस सुरक्षेत दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्रसेवा दल येथील नियोजित सभास्थळी जात होती. परंतु रस्त्यातच त्यांच्यावर हा भीषण हल्ला झाला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यानंतर पुणेकर जनतेने वागळे यांच्या सभेला उत्स्फुर्त गर्दी करून भाजपच्या गुंडप्रवृत्तीला चोख प्रत्युत्तर दिले.

दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दल येथे विविध संघटनांमार्फत ‘लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या विषयावर शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमास वागळे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, अ‍ॅड. असीम सरोदे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी ६ वाजेच्या या सभेला निखिल वागळेंसह अ‍ॅड. असीम सरोदे हे दांडेकर पुलाकडे जाण्यास निघाले असता, पोलिसांची सुरक्षा असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीला दगडांनी लक्ष्य केले. गाडीच्या काचा फोडल्या व वागळेंवर शाईफेक केली. कार अडविण्याचा प्रयत्न करून वागळे यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न असावा, असा संशय निर्माण झाला आहे. खंडोजीबाबा चौक येथे ही संपूर्ण घटना घडली. वागळे यांच्या कारवर अंडी आणि दगड फेकण्यात आले आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, समविचारी पक्ष व संघटनानी एकत्र येत ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा देत भाजप व पोलिसांचा तीव्र निषेध केला. त्यामुळे काही प्रमाणात वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी व उपस्थित पोलिसांनी भाजपच्या आंदोलन करणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वातावरण काही प्रमाणात वातावरण निवळले. त्यानंतर कार्यक्रमासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोडण्यात आले. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटेनवर संतप्त प्रतिक्रिया दिली. आताच हा प्रकार झाल्याचे मला समजले, मी तिथल्या पोलिस आयुक्तांशी लगेच बोलणार आणि कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला.


जीवंत असेपर्यंत लोकशाहीसाठी संघर्ष करणार – वागळे

या सभेला उपस्थित राहिल्यानंतर भाषणात निखिल वागळे म्हणाले की, ‘आमचा वाहनचालक वैभव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अंगावर घेतले, म्हणून आम्ही आज जीवंत आहोत. कारण हल्लेखोरांचा गट आमच्या वाहनावर अक्षरश: चढले होते आणि फोडाफोडी केली.’ ‘जोपर्यंत आम्ही जीवंत आहोत, तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार. या भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होऊ देणार नाही. ही साधी लढाई नाही, ही फॅसिझमविरोधातली लढाई आहे. ‘जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोवर तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही,’ असे वागळे यांनी यावेळी भाजप व आरएसएसला ठणकावून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!