आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सोळू गावात एल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवारी ( दि. ८ ) भीषण स्फोट होऊन दुर्दैवी घटना घडली. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी आहेत. जखमी व्यक्तींना ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत रामचंद्र निंबाळकर , संतोष माने ( रा. सोळू), आणि नवनाथ पांचाळ अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेत बेबीताई ठाकूर, नंदा शेळके, रणवीर गावडे, चंद्रकांत निंबाळकर, मोनू गौतम, दिनेश मौर्य, दीपक ठाकूर, गणेश कोटंबे, श्रुती ठाकूर, विठ्ठल ठाकूर, निवृत्ती ठाकूर, मनीषा फुलशेटे, बसवराज बनसोडे, नागेश ठाकूर, उमेश ठाकूर, शिवांश ठाकूर, अमेंद्र पासवान, रणजीत पासवान सर्व रा. सोळू , अब्दुल खान रा. चिखली या सर्वाचा जखमीं मध्ये समावेश आहे. यात, नरेंद्र मोहनलाल सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र हरकचंद मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवारी पाचचे सुमारास कंपनीत स्फोट झाला. या स्फोटाने परिसरास जोरदार हादरा बसला. परिसरातील घरांचे नुकसान झाले. लगत उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या जाळून खाक झाल्या. क्तजनावरे देखील बाधित झाली. गवताचे साठ्याला आग लागून नुकसान झाले. यात लहान मोठ्या दहा गाड्यांचे नुकसान झाले. स्फोट विद्युत रोहीत्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र रोहित्र सुस्थितीत असून त्यातून होणारा विज पुरवठा बंद होता. तसेच स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर पडल्याने रोहीत्राचे खांब वाकले आहेत. स्फोट रोहीत्रामुळे झाला नसल्याचे महावितरण कडून खुलासा करण्यात आला आहे.
स्फोट झालेल्या कंपनीत एल्युमिनियम प्लेट तयार केल्या जात होत्या. गेल्या चार वर्षांपासून कंपनी बंद असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत बाधित झालेल्या घरांचे पंचनामे खेड तहसील कार्यालयाचे वतीने सुरु केले जाणार आहेत. खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी घटनास्थळी वैद्यकीय पथक मार्फत आरोग्य सेवा सुविधा देत आढावा घेतला आहे.
स्फोट झालेल्या कंपनी मालकावर गुन्हा दाखल
सोळू गावात एल्युमिनियम प्लेट तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. १९ जखमीं झाले असून त्यांचेवर ससून सह इतर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कमानीचे मालक नरेंद्र सुराणा (रा. गुलटेकडी, पुणे), फनेंद्र मुनोत (रा. शिवाजीनगर, पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोळू ते खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलॉय प्रा ली ही कंपनी असून गेली चार वर्षांपासून बंद आहे. कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये एल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनविण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता. त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. या कच्चा मालाला आग लागून मोठा स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. घटनेत घरांचे, वाहनांचे आणि दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.