‘त्या’वळण मार्गावर अपघाताची मालिका सुरूच; उपायोजना करा, अन्यथा जनआंदोलन उभारू!
देऊळगावराजा (तालुका प्रतिनिधी) – येथील शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वळण मार्गावर जाफराबाद चौफुलीजवळ वारंवार अपघाताची मालिका सुरूच आहे. या चौफुलीवर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे अपघात रोखण्याच्या दृष्टीने लेखी निवेदने देऊनदेखील कुठल्याही उपाययोजना राबवल्या जात नाही. त्यामुळे सदर वळण रस्त्यावर वारंवार होणारे अपघात रोखण्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपयोजना करा. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात जन आंदोलन उभारू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांना दिला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिलेल्या इशारा निवेदनात नमूद आहे की, शहराच्या वळण रस्त्यावर असलेल्या धोकादायक जाफराबाद चौफुलीवर वारंवार अपघात घडत आहे. काल (ता.8) पहाटे ट्रक पलटी होऊन अपघात घडला. सदर अपघातात ट्रक चालक गंभीरित्या जखमी झाला आहे. मागील आठवड्यातदेखील या चौफुलीवर अपघात होऊन तीन ते चार जण जखमी झाले होते. जेव्हापासून हा वळण मार्ग झाला आहे तेव्हापासून जाफराबाद चौफुलीवर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. सदर वळण मार्ग हा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असून अपघाताचा राष्ट्रीय वळण मार्ग बनला आहे. या वळण मार्गावरील जाफराबाद चौफुलीदरम्यान मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग अकोला विभागाकडे लेखी स्वरूपात निवेदने देऊनदेखील दखल घेतलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग या वळण रस्त्यावरील अपघातांच्या मालिका थांबविण्याच्या दृष्टीने उपयोजना करीत नाही. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या वळण मार्गावर महत्त्वपूर्ण चौफुलीवर नेहमी अंधार असतो. आवश्यकतेनुसार गतिरोधक नसल्याने अपघात घडत आहे. या वळण रस्त्यावरील जाफराबाद चौफुलीवर वारंवार घडणारे अपघात रोखण्याच्या दृष्टीने तात्काळ उपयोजना करा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्यावतीने जनआंदोलन उभारू, असा इशारा तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, सचिव जहीर पठाण, अजमत खान, मुबारक चाऊस, सुरेश कोल्हे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, शंकर वाघमारे, अमोल उदयपूरकर, सचिन कोल्हे, असलम खान, बबन बुरकूल, संभाजी मुजमुल, सचिन शिंगणे, अनिस शाह, साजिद खान, शे. समीर, राजू गव्हाणे आदी निवेदनाद्वारे दिला आहे.