– विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले निवेदन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मतदान यंत्रावर (ईव्हीएम) निवडणूक घेण्याबाबत सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी संशय घेतला असतानाच, आता स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या अध्यक्षा करूणा धनंजय मुंडे यांनीदेखील ईव्हीएमवर संशय व्यक्त करत, आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, अन्यथा ईव्हीएम जेथे ठेवले जाईल, तेथील आणि मतमोजणी केंद्रात जामर लावून, इंटरनेट सेवा बंद केली जावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात करूणा मुंडे-शर्मा यांनी नमूद केले आहे, की आज भारतात ईव्हीएम मशीनबाबत अनेक संशय आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा व इतर निवडणुका या मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. तसे शक्य होत नसेल तर मतदानानंतर ईव्हीएम जेथे ठेवले जातात तेथे व जेथे मतमोजणी होते तेथे जामर बसविण्यात यावेत, आणि इंटरनेट सेवा बंद केली जावी. जेणे करून संशयाला जागा राहणार नाही व सर्व उमेदवारांना न्याय मिळेल. माझे पती धनंजय मुंडे यांनी २०१९च्या निवडणुकीत विदेशातून ईव्हीएमच्या एका मोठ्या तंत्रज्ञाला विदेशातून बोलावले होते. त्यातून असे लक्षात आले की जामर लावले व इंटरनेट बंद केले तर ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येत नाही. तरी, कृपया सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी मागणीही करूणा मुंडे-शर्मा यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष काय निर्णय घेतात, व याबाबत निवडणूक आयोगाला काही शिफारशी पाठवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
——-