सिंदखेडराजा तहसीलदारांविरोधात पत्रकारांचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अनधिकृत रेती वाहतुकीसंदर्भात बातमी प्रकाशित केल्याने सिंदखेड़राजाचे तहसीलदार जयस्वाल यांनी फोनवर बोलताना अयोग्य वागणूक दिल्याचा आक्षेप घेत, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव मोरे यांच्या नेतृत्वात संबंधित पत्रकारांनी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत, कारवाईची मागणी केली आहे.
उपजिल्हाधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, खड़कपूर्णा नदीपात्रातून काही महिने अधिकृत रेती वाहतूक सुरू होती. त्याच कालावधीत रात्रीच्यावेळी विनानंबर व कोणतीही पावती नसलेले टिप्पर अवैधपणे मलकापूर पांग्रा, शेंदुर्जनसह इतर भागात रेती विक्री करताना आढळून आले. या वाहनामुळे अपघात होवून जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. याबाबत मलकापूर पांग्रा येथील पत्रकार गंगाराम उमाळे यांनी सदर अवैध रेती वाहतुकीची माहिती तहसीलदार जयस्वाल यांना २३ जानेवारीरोजी दिली. पण कोणतीही कारवाई न झाल्याने याबाबत २६ जानेवारीरोजी त्यांनी सविस्तर बातमी प्रकाशित केली. त्यावर तहसीलदार जयस्वाल यांनी फोनवर बोलताना अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रतापराव मोरे यांच्यासह संबंधित पत्रकारांनी केली आहे. उपजिल्हाधिकारी पाटील यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रतापराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे व बबन सरकटे, प्रसिद्धी प्रमुख सचिन खंड़ारे, जिल्हा सचिव राजेंद्र मोरे, तालुकाप्रमुख गंगाराम उबाळे आदींच्या सह्या आहेत.
सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांत बोगस पत्रकारांचाही सुळसुळाट!
दरम्यान, पत्रकार उबाळे यांच्याबाबत तहसीलदारांनी योग्य भाषा वापरली नाही, ही गंभीर बाब असली तरी, देऊळगावराजा, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यांत अनेक बोगस पत्रकार खुलेआम अधिकारीवर्गाशी गैरवर्तन करत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. कुठले तरी युट्यूब चॅनल, किंवा न्यूज पोर्टलचे हे पत्रकार असल्याचे सांगतात, त्यांच्याकडे बूम व रजिष्ट्रेशन नंबर नसलेले आय-कार्डदेखील असते. परंतु, त्यांच्या डिजिटल मीडियाची केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी, किंवा त्यांना केंद्र सरकारची मान्यता नसते. त्यामुळे या पत्रकारांशी कसे वागावे? असादेखील प्रश्न अधिकारीवर्गाला पडला असून, त्यांच्यामुळे खरे पत्रकारदेखील असे अडचणीत सापडत आहेत. जे खरे पत्रकार असतात ते अधिकारीवर्गाशी सौजन्याने व सभ्यपणे वागतात. तर बोगस पत्रकारांची भाषा उर्मट व ब्लॅकमेलिंगची असल्याने अधिकारीवर्गही संताप व्यक्त करत आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या डिजिटल मीडियात आमच्या माहितीप्रमाणे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ व ‘बुलढाणा लाईव्ह’ हे दोनच न्यूजपोर्टल केंद्र सरकारकडे नोंदणीकृत आहेत. इतर कुणाची बुलढाणा जिल्ह्यात नोंद सापडत नाही, असेल तर त्यांनी आम्हाला कळवावे. त्यामुळे अशा बोगस पत्रकारांवर जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस पत्रकार गजाआड गेल्याशिवाय खर्या पत्रकारांना न्याय मिळणार नाही, अशीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.
—–