अशोक चव्हाणांची “पाऊले चालती भाजपची वाट”!
– ‘आगे आगे देखो होता है क्या’- देवेंद्र फडणवीस; चव्हाणांचा राजीनामा काँग्रेसकडून मंजूर
– १५ तारखेला अमित शाहांच्या उपस्थितीत काही आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश शक्य!
मुंबई (खास प्रतिनिधी) – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेस (यूपीए) सत्ताकाळातील घोटाळ्यांसंबंधी श्वेतपत्रिका संसदेच्या पटलावर सादर करून, या श्वेतपत्रिकेत आदर्श सोसायटी घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागलेले काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, अशोक चव्हाण यांनी आज (दि.१२) तडकाफडकी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ११ आमदार असल्याची माहिती असून, चव्हाण यांच्यासह हे सर्व आमदार लवकरच भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भाजप सूत्राच्या माहितीनुसार, चव्हाण यांचा १५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश निश्चित असून, त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी व आमदारदेखील भाजपात प्रवेश घेणार आहेत. दरम्यान, काँग्रेसने चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे. चव्हाण हे भाजपमार्फत राज्यसभेवर जाणार असल्याचे एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या..’, अशी फिल्मीस्टाईल प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना झाले असून, भाजप नेते आशीष शेलार व देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्ष कार्यालयात पोहोचून काही तरी खलबते करताना दिसून आले आहेत. अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागामुळे काँग्रेसची राज्यसभेची जागा धोक्यात आली असून, चव्हाण यांच्यासोबत काही आमदार व एकूण १३ जण भाजपमध्ये जाणार आहेत, असे विश्वासनीय सूत्राने स्पष्ट केले आहे. तसे झाले तर काँग्रेसला महाराष्ट्रातून एकही राज्यसभेसाठी जागा मिळणार नाही, अशी शक्यता आहे.
अशोक चव्हाण हे हे हार्डकोर काँग्रेस लीडर असून, ते भाजपमध्ये जाण्यासंदर्भात यापूर्वीही अफवा पसरल्या होत्या. परंतु, आता त्यांच्या राजीनाम्यांमुळे त्या सत्यात उतरत आहेत. चव्हाण हे डिसेंबर २००८ ते नोव्हेंबर २०१०पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. डिसेंबरमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, तेव्हा विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद काढून चव्हाण यांना ते पद देण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे, अशोकराव हे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र असून, काँग्रेसचे महासचिव, नांदेड येथून खासदारदेखील ते राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता-पुत्र या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे, असे ते चव्हाण घराण्यातील हार्डकोर काँग्रेस नेते होते. त्यांचा काँग्रेस सोडण्याचा निर्णय अनेकांना रूचलेले नसून, त्यांच्यावर टीकाही सुरू आहे. अशोक चव्हाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं अलीकडेच काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. छत्तीसगडच्या प्रचार सभेत पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी भाजपला साथ दिली. आता श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला.
आगे आगे देखो होता है क्या 🔥🔥🔥@Dev_Fadnavis Ji
#AshokChavan #MaharashtraPolitics pic.twitter.com/Dx4c5L60wU— Thakur Pranav Singh 🇮🇳 𝕏 (@PranavSinghBjym) February 12, 2024
काँंग्रेस नेत्यांचे आमदारांना फोनाफोनी सुरू!
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदारांना फोनाफोनी करण्यात व्यस्त झाले असून, अनेक काँग्रेस आमदारांचे स्वीचऑफ येणारे फोन पाहाता, काँग्रेस नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मुंबई बैठक घेऊन काँग्रेसच्या आमदारांना संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.
- काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय नेत्यांना फोडणे, ईडी सारख्या चौकशा लावणे, हताश होऊन अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. भाजपची ही युक्तीच आहे, असेही प्रणिती शिंदेंनी सांगितलं.
- नवी दिल्ली | काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या देखील दाखल झाल्या आहेत. तसेच केसी वेणू गोपाल, सलमान खुर्शीद यांच्यासह वरिष्ठ नेते खरगे यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. या बैठकीत आज घडलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीबाबतही चर्चा होणार असल्याचं समजतंय. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या नावाबाबत चर्चा होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
- अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेस पक्षाने आमदारांची 14 तारखेला बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या सूचना सगळ्या आमदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 14 कॉंग्रेससोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.
- आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील, सगळ्यांकडे आपली स्ट्रेंथ आहे, त्यांचे एक सीट सहज निवडून येईल. कुठल्याही पक्ष प्रवेशाचा फायदा होतो. प्रत्येकाची क्षमता आहे त्याचा फायदा होईल. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा अनेक पक्ष प्रवेश होतील. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, भाजपला बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज नाही. अजूनही रोज भाजप पक्षात प्रवेश होत आहेत. राज्यसभेची तयारी करण्याची आम्हाला गरज नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.