बुलढाणासह सहा लोकसभा जागांची आंबेडकरांकडून महाआघाडीकडे मागणी!
– महाविकास आघाडीच्या बैठकीला आंबेडकरांची उपस्थिती, नाराजी दूर!
मुंबई (खास प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत वंचित बहुजन विकास आघाडीचा समावेश झाल्यानंतर आज (दि.२) मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या राज्यातील नेत्यांच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. पूर्वी १२ जागांचा आग्रह धरणारे आंबेडकर आता सहा जागांवर आले असून, त्यांनी बुलढाणा, अकोला, अमरावती या विदर्भातील तीन जागा, परभणी ही मराठवाड्यातील जागा, दक्षिण-मध्य मुंबई, व सोलापूरची जागा महाविकास आघाडीकडे मागितली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत याच जागांवर वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते. या जागा आंबेडकरांना सोडण्यास महाविकास आघाडीचे नेते तयार असल्याचेही हे खात्रीशीर सूत्र म्हणाले. त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून इच्छूक असलेले प्रा.नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ व जयश्रीताई शेळके, सोलापूरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रह धरणार्या प्रणिती शिंदे यांची मोठी राजकीय गोची झाली आहे. तर आंबेडकर हे कुणाला उमेदवारी देणार याबाबतही आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी महत्वपूर्ण नेत्यांसोबतच्या राजगृह येथे झालेल्या बैठकीतदेखील आंबेडकरांनी १२ ऐवजी ६ जागांचा प्रस्ताव मांडला, असल्याचे निकटवर्तीय सूत्रांचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ हा महत्वाचा फॅक्टर ठरला होता. त्यामुळे यंदाच्या जागावाटपात ‘वंचित’च्या मतांचा टक्काही महत्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीला सन्मानपूर्ण वागणूक मिळण्यावरुनदेखील प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली होती. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले तर शिवसेनेकडून संजय राऊत या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांचे स्वागत केले. एवढेच नाही तर बैठकीनंतर सगळ्यांनी एकत्र स्नेहभोजनही केले. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर नाराजी नाट्याला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसून आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की ‘इंडिया आघाडीचे अस्तित्व आता संपले आहे. त्यामुळे आम्ही सावधानीपूर्वक पाऊले उचलत आहोत. महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी एक सर्वमान्य कार्यक्रम निश्चित करू, त्यानंतर जागावाटपाबाबत चर्चा करता येईल. आजच्या बैठकीत काही प्रस्ताव दिले आहेत, त्यावर महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील, त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू’, असेही आंबेडकरांनी सांगितले.