आंबेडकरांची मर्जी राखणे महाआघाडीत कठीण; विदर्भात फक्त अकोल्याची जागा सुटण्याची शक्यता!
– आंबेडकर महाआघाडीसोबत राहतील की स्वतंत्र लढतील?, याबाबतही संदिग्धता!
पुरूषोत्तम सांगळे
मुंबई – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी काही दिवसांचाच वेळ उरला आहे. तरीदेखील महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीचे जागावाटप नवी दिल्लीत भाजपच्या ‘हायकमांड’पुढे होणार असले तरी, महायुतीच्या जागावाटपाबाबत मात्र गोंधळाची स्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यात महाविकास आघाडीला यश आले असले तरी, त्यांची मर्जी सांभाळणे महाआघाडीच्या नेत्यांना कठीण जात आहे. आंबेडकरांनी १२ जागांवरून खाली उतरत सहा जागा मागितल्याची माहिती हाती येते आहे, परंतु त्यांना केवळ तीन जागा देण्यावर नेत्यांचा खल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आहे. विशेष बाब म्हणजे, विदर्भात फक्त अकोल्याची जागा आंबेडकरांना सोडण्यास महाआघाडीचे नेते तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकर खरेच महाआघाडीत थांबतील की स्वतंत्र लढतील? याबाबत ठामपणे सांगता येत नाही. आंबेडकर स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा अर्थातच महायुतीला पर्यायाने भाजपला होणार आहे. वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार, विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सहा जागांवर काँग्रेस, दोन मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे) तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि वंचित बहुजन आघाडी प्रत्येकी एका जागेवर लढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग व प्रशासनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील गोंधळाच्या राजकीय समिकरणांत जागावाटपाची बोलणी अद्याप पूर्ण झालेली नाही. राज्य पातळीवरील नेते सर्वप्रथम एक ‘फिगर’ निश्चित करणार असून, त्यानंतर पक्षांचे ‘हायकमांड’ त्यात वाटाघाटी करणार आहेत. महायुतीचे जागावाटप स्थानिक पातळीवर होणार असल्याचे दर्शविले जात असले तरी, कुणाला किती जागा द्यायच्या हे नवी दिल्लीतील भाजपचे ‘हायकमांड’ निश्चित करणार आहे. त्यामुळे अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे पक्ष तसे फारसे आग्रही नाहीत. दुसरीकडे, महाआघाडीत मात्र प्रकाश आंबेडकरांची गरज आहे. तथापि, आंबेडकरांची मर्जी सांभाळणे राज्यातील काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्वाला अवघड जात आहे. कालच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम ठरवणे, आणि ज्या सहा मतदारसंघांचा आग्रह त्यांनी धरला आहे, त्याबाबत लवकरात लवकर होकार देणे, हे महत्वाचे मुद्दे आंबेडकरांनी प्रदेश पातळीवरील महाआघाडीच्या नेत्यांपुढे मांडलेले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. परंतु, फक्त विदर्भाचाच विचार करता, जागावाटपाचे हे सूत्र महाआघाडीला मान्य होणे अवघड दिसते. विदर्भात एकूण दहा जागा आहेत. त्यात सहा जागा पूर्व विदर्भात तर चार जागा पश्चिम विदर्भात म्हणजे वर्हाडात आहेत.
पूर्व विदर्भातील सहापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा आहे. तर वर्धा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना हवा आहे. रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपविण्यास उद्धव ठाकरे तयार होऊ शकतात. फक्त बंडखोर पडला पाहिजे, अशी त्यांची अट आहे. वर्हाडातील चार लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. फक्त बुलढाण्याबाबत थोडी अडचण निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला, अमरावती व बुलढाणा या तीन जागांची मागणी केलेली असली तरी, महाआघाडीचे नेते आंबेडकरांना अकोला सोडण्यास तयार आहेत, पण बुलढाणा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोडण्यास तयार नाहीत. येथून ठाकरे यांच्याकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर व जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर हे दोन नेते लोकसभेसाठी तयार आहेत, असे ‘मातोश्री’वरील विश्वासू सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुलढाणा व यवतमाळ-वाशिम या दोन मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरलेला आहे. तर अमरावती मतदारसंघ हा काँग्रेसने मागितला असून, आंबेडकरदेखील हा मतदारसंघ मागत असले तरी ते आपला दावा सोडू शकतील की नाही, याबाबत संदिग्धता आहे. एकूणच पश्चिम विदर्भात अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना, बुलढाणा व यवतमाळ-वाशिम या दोन जागा शिवसेना (ठाकरे) तर अमरावतीची जागा काँग्रेसला मिळू शकते, असे राजकीय सूत्र सांगत आहेत. अर्थात, हे जागावाटप आंबेडकरांना मान्य होणे गरजेचे आहे. आंबेडकर हे महाआघाडीत जवळपास सहभागी झाल्याचे चित्र असले तरी, जोपर्यंत जागावाटप पूर्ण होत नाही, आणि त्यात आंबेडकर समाधानी होत नाहीत, तोपर्यंत ते महाआघाडीसोबत राहतीलच, याची काहीच खात्री नाही. तथापि, ते जर महाआघाडीतून बाहेर पडले तर मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जबर फटका बसणार आहे. आंबेडकरांनी महाआघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढावे, यासाठी महायुतीतील एक घटक जोरदार लॉबींग करत असल्याची चर्चादेखील मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर ही ‘महायुती’ची बुलढाण्यातील सर्वात मोठी अडचण!
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जोरदार लाट निर्माण झाली असून, त्याचा फटका ‘महायुती’ला बसणे निश्चित आहे. तर दुसरीकडे, तुपकर हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची राजधानी मुंबईत जोरदार चर्चा आहे. ऐनवेळी ते शिवसेनेचे उमेदवार राहू शकतात. तसे झाले तर ठाकरे यांना त्यांचा फायदा मराठवाड्यातील काही जागा, आणि शेजारील यवतमाळ-वाशिम जागेसाठीही होऊ शकतो. त्यामुळेच तुपकर यांना स्थानबद्ध करून त्यांच्या हालचाली रोखण्याचा डाव राज्य सरकारमधील एका सत्ताधारी घटकाने आखला असल्याची माहिती कानावर येते आहे. त्यादृष्टीने बुलढाणा पोलिसांनी तुपकरांवरील सर्व गुन्ह्यांची जंत्रीच गोळा करून जिल्हा न्यायालयापुढे सादर केली आहे. शेतकरीप्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार्या रविकांत तुपकरांना ‘सराईत गुन्हेगार’ ठरवून, जेलमध्ये डांबण्याचे शिंदे सरकारचे षडयंत्र यानिमित्ताने दिसते आहे. तुपकर हे जेलमध्ये राहूनही बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, आणि सहानुभूतिच्या लाटेवर ते जिंकूनही येऊ शकतात. परंतु, त्यांच्या हालचाली ठप्प पडणार असल्याने ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले तर त्याचा राजकीय फायदा ठाकरे यांना घेता येणार नाही. महाआघाडीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले की, ठाकरे हे स्वतः बुलढाण्यात लक्ष घालतील, असे ‘मातोश्री’च्या सूत्राने सांगितले आहे. कारण, ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना धूळ चारायची असून, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे त्यांच्या निशाण्यावर आहेत.
————