Head linesNAGARPachhim Maharashtra

भाविकांच्या अलोट गर्दीने श्रीक्षेत्र भगवानगडावर श्री संत भगवानबाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचा ५९ वा पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र भगवानगडासह पूर्ण देशभर संपन्न झाला. भगवानगड येथे काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची महापंगत झाली. संत भगवानबाबा यांच्या समाधी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले .भगवान बाबा की जय या जयजयकाराच्या जयघोषाने व टाळ मृदुंगाच्या गजराने गड दुमदुमून गेला होता.

देशातील अध्यात्मिक क्षेत्रामध्ये नामांकित असलेले श्री क्षेत्र भगवानगड हे ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. गडाचा जवळपास ७० टक्के भक्तवर्ग हा ऊसतोड कामगार आहे. या कामगारांच्या व भाविकांच्या अपार श्रद्धेमुळे आणि गडाचे विद्यमान मठाधीपती ह.भ.प.न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भगवानगड हे देशातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आज बनले आहे. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठ, विद्यार्थी वस्तीगृह आणि दररोजचे मोफत अन्नदान ही भगवानगडाची वैशिष्ट्ये आहेत. महंत डॉ.नामदेव शास्त्रीजी गादीवर बसल्यापासून भगवानगडाचा मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक आणि भौतिक कायापालट झाला आहे. विशेष म्हणजे, जी ज्ञानेश्वरी श्री संत भगवानबाबा पाण्यावर बसून वाचत होते, तीच ज्ञानेश्वरी आज गडाचे मठाधीपती न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री बाबा हे अतिशय सोप्या भाषेमध्ये जगाला समजावून सांगत आहेत. शुक्रवारी सकाळी ठीक नऊ वाजता वै.श्री संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा पार पडली. दुपारी बारा ते दोन या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधीपती ह.भ.प. न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततूल्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनानंतर उपस्थित लाखो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.


श्रीक्षेत्र भगवानगड येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य अशा मंदिराचे बांधकाम चालू झाले असून, वर्षभरामध्ये मंदिराची उभारणी होणार आहे. गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्या कल्पनेतून मंदिराची उभारणी होत आहे. काळ्या पाषाणात बांधकाम होणारे हे मंदिर राज्यात एकमेव भव्य मंदिर असेल, त्यांचे संकल्पचित्र पुण्यतिथी दिवशी प्रसिद्ध झाल्याने नियोजित मंदिराचे संकल्प चित्र हे भाविकाचे आकर्षण ठरले होते.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!