असोला परिसरातील महिलेच्या हत्याकांडाने सस्पेन्स वाढविला!; महिलेची ओळख देणार्यास मिळणार ५० हजाराचे बक्षीस
अंढेरा (हनिफ शेख) – गेल्या पाच ते सहा दिवसापूर्वी अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली ते देऊळगांवराजा हायवे रोडवर, असोला परिसरात असलेल्या हॉटेल राजवाडाच्या पाठीमागे फॉरेस्ट जंगलातील गट नंबर ५४१ मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने, एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्षे हिचा निर्घृण खून केला आणि तिची ओळख पटू नये म्हणून, तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्धवट जाळले. नग्नअवस्थेतील प्रेत आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या खुनाचा अद्याप छडा लागला नसून, महिलेची ओळख पटविणे व मारेकरी शोधून काढणे हे मोठेच आव्हान अंढेरा पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या महिलेची ओळख पटवून देणार्यास रोख ५० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी कळविले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या देऊळगावराजा ते चिखली महामार्गावरील अंचरवाडी ते मेरा खुर्द मधोमध असोला शिवारात रोडवर बंद अवस्थेत एक राजवाडा नावाचा ढाबा आहे. या धाब्याचा आजूबाजूला सरकारी फॉरेस्टचे घनदाट जंगल आहे. या धाब्याच्या पाठीमागे गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी एका २० ते २५ वयाच्या महिलेला अज्ञात व्यक्तीने खून करून अर्धवट जाळून टाकले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार विकास पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, खून असल्याचा प्रकार पाहून लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक, एलसीबी पथक, आरोग्य पथक, एसडीपीओ पाटील यांना घटनास्थळी बोलावून मृतक महिलेचा व घटनास्थळाचा पंचासमक्ष पंचनामा केला असता, सदर महिलेच्या डोक्याचे पाठीमागील बाजूस काहीतरी मारुन, जखमी करुन, तिला जिवाने ठार मारले. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून, तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अर्धवट जाळले आहे. तिच्या हातावर लव्ह (दिल) चिन्ह गोंदलेले असून, त्यावर एस के इग्रजी मध्ये गोंदलेले, आणि पंचरंगी धागा बांधलेला आढळून आला. अशा घटनेवरून बीट जमादार वाघ यांनी अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०२,२०१ भादविंप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आणि, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी अंढेरा पोलीस सूत्रांनी महाराष्ट्रातील आजपर्यंत बेपत्ता झालेल्या ३४ हजार महिलेच्या नातेवाईकांना चौकशी केली. परंतु ओळख पटली नाही. त्यामुळे ज्यांनी अशी वर्णन असलेल्या महिलाची ओळख पटवून दिल्यास त्या व्यक्तीला पोलीस प्रशासनाकडून ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन ठाणेदार विकास पाटील यांनी केलेले आहे.
ही महिला कोण, कुठली, तेथे कशी आली?
अर्धवट जळालेली व अगदी नग्नावस्थेत सापडलेली ही महिला विवाहित असल्याचे तिच्या गळ्यातील मंगळसुत्रावरून स्पष्ट होत आहे. ती जिल्ह्यातील असती तर आतापर्यंत पोलिसांना तिचा सुगावा लागला असता. परंतु, आता ती जिल्ह्याबाहेरील असल्याचा संशय बळावला आहे. तिचा अनैतिक संबंधातून किंवा प्रेमसंबंधातून खून झाला असल्याचा प्राथमिक संशय असला तरी, ती असोला शिवारात आली कशी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मारेकरी हा परिसरातीलच असावा, असादेखील पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने पोलिस मारेकर्याचा कसून शोध घेत आहे. ज्या निर्घृणपणे या महिलेचा खून करण्यात आला तो प्रकार पाहाता, हा अतिशय थंड डोक्याने व नियोजनबद्धपणे केलेला खून असल्याचाही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना संशय आहे. मारेकरी कितीही चतुर असला तरी तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकेल, असा विश्वासही पोलिस अधिकार्यांना आहे.
————