अझीम नवाज राही, सिंधुताई पाटील, श्याम भुतेकर, डॉ.कपिल मुळे यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान
– न्यूनगंड न बाळगता नवी कौशल्ये आत्मसात करा; रविकांत तुपकरांचे तरूणाईला आवाहन!
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ व जानकीदेवी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा माजी मंत्री तथा जिल्ह्याचे विकासपुरूष, भागिरथ नेते भारतभाऊ बोंद्रे व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याहस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिध्द साहित्यिक, कवी अझीम नवाज राही यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल सिंधुताई विष्णुपंत पाटील यांचा गौरव करण्यात आला. श्याम भुतेकर-पाटील यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सिग्मा हॉस्पिटलचे न्युरोसर्जन डॉ.कपिल मुळे यांना गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची भावना न बाळगता आपल्यातील अंगभूत कौशल्ये जपतानाच, नवी कौशल्ये आत्मसात करत विकास साधला पाहिजे, असे आवाहन तुपकर यांनी तरूणाईला याप्रसंगी केले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारत शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांच्या कल्पकतेतून समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, कवी संमेलने व साहित्य संमेलने यासारखे वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा आदर्श जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी संस्थेच्यावतीने समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांची निवड करुन त्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील नामवंत मराठी व उर्दू कवी तथा लेखक, प्रख्यात निवेदक अजिम नवाज राही, छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पीटलमध्ये कार्यरत असलेले सुप्रसिध्द मेंदूविकार तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ.कपिल मुळे, बुलडाणा जिल्ह्यातीलच परंतु सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकरी साहित्य चळवळीत कार्यरत असलेले झेप साहित्य संमेलनाचे उद्गाते व झेप वृत्तपत्राचे संपादक डी. एन. जाधव, बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीत मोलाचे योगदान व सामाजिक क्षेत्राशी बांधिलकी जपणार्या शरद कला महाविद्यालयाच्या अध्यक्षा सौ.सिंधूताई विष्णूपंत पाटील, तसेच बुलढाणा जिल्ह्यातीलच इसरुळ येथील आधुनिक शेतीचे पुरस्कर्ते व आदर्श शेतकरी तथा समाजसेवक श्याम पाटील भुतेकर या पाच मान्यवरांची या पुरस्कारांसाठी निवड झाली होती. दि. २८ जानेवारीरोजी सकाळी साडेदहा वाजता जानकीदेवी विद्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याच्या जलक्रांतीचे भाग्यविधाते तथा माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली, व शेतकरी चळवळीचे झुंजार नेते रविकांत तुपकर यांच्याहस्ते, तसेच जिल्ह्याचे व्यापार क्षेत्रात अग्रस्थानी असलेले दानशूर व्यक्तिमत्वाचे धनी इंदरसेठ जैन व चिखली पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. उषाताई थुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले.
जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही ग्रामीण भागातील एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून प्रचलित आहे. या शाळेत केवळ पुस्तकी शिक्षण न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यावर भर दिला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम येथे केले जाते. शाळेचे संस्थापक शेनफडराव घुबे उर्फ दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचे काम गेली २५ वर्षे अविरतपणे सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची भावना न बाळगता आपल्यातील अंगभूत कौशल्ये जपतानाच नवी कौशल्ये आत्मसात करत विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याप्रसंगी केले. तर, या कार्यक्रमाला जिल्ह्याचे विकासपुरूष तथा भागिरथ नेते भारतभाऊ बोंद्रे हे आवर्जुन उपस्थित राहून मान्यवरांना पुरस्कार प्रदान केल्याने या सोहळ्याला त्यांच्या उपस्थितीने मोठी उंची लाभली होती. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचीही उपस्थिती लाभणार होती, परंतु, ते आजारी असल्याने कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत, तथापि, त्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांना आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे यांनी करुन पुरस्कार सोहळ्यामागची भूमिका विषद केली. समाजात विविध क्षेत्रात चांगले काम करणार्या व्यक्तिंंचा गौरव करणे म्हणजे, चांगले काम करण्यासाठी असे नामवंत व्यक्ती निर्माण व्हावेत, यासाठी समाजबुद्धीला चालना देणे होय, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उर्दू कवी तथा लेखक व प्रख्यात निवेदन अजीम नवाज राही, शेतकरी चळवळीचे नेते रविकांत तुपकर, ख्यातनाम युवा शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे (सांगली) यांनी आपल्या भाषणातून विविध विषयांवर प्रकाश टाकून शेनफडरावजी घुबे हे समाजासाठी करीत असलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच, तरूणपिढाला प्रबोधन केले. यावेळी व्यासपीठावर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील भुतेकर, शेतकरी संघटनेचे नेते अमानुल्ला खॉसाब, शिवसेना नेते पंजाबराव जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ.विकास मिसाळ, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश भुतेकर, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतीश पाटील भुतेकर, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील जावळे, माजी सभापती तथा शेतकरी नेते भानुदास पाटील घुबे, बाजार समितीचे संचालक प्रकाश आबा घुबे, माजी सरपंच दीपक पाटील घुबे, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाबराव घुबे, माजी संचालक भानुदास पाटील थुट्टे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर बहुआयामी आणि जीवन भारावून टाकणारे तडाखेबाज व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाचे प्रभावी असे सूत्रसंचलन निर्भीड पत्रकार रणजितसिंह राजपूत यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे सचिव प्रा.उद्धवराव घुबे यांनी मानले.