SINDKHEDRAJA

दुसरबीड येथे वंजारी समाजाच्या स्मशानभूमीची जमीन हडपण्याचा डाव; समाज बांधवांचे तहसीलसमोर आमरण उपोषण

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मूळची ई-क्लास असलेली व वंजारी समाजाला वहिवाटीने स्मशानभूमीसाठी मिळालेली शासकीय जमीन चक्क खोटे दस्तावेज बनवून हडपण्याचा डाव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलेला आहे. विशेष म्हणजे, संबंधितांना ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व गटविकास अधिकारीदेखील साथ देण्याचा प्रयत्न करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही जमीन वंजारी समाजाच्या हक्काची असल्याने तिचे हस्तांतरण थांबवून, ती समाजाला देण्यात यावी, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सिंदखेडराजा तहसीलसमोर आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील गट नंबर ७०६ ई क्लास जमिनीतील वंजारी समाजाचे वंशपरंपरागत स्मशानभूमीची नोद ०.८२ आर स्मशानभूमी म्हणून सातबारा अभिलेखात नोंद घेण्याबाबत, त्याचबरोबर युवाशक्ती सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष गजेंद्र देशमुख हे ग्रामपंचायत सचिव, सरपंच, पंचायत समितीमधील अधिकार्‍यांना हाताशी धरून सदर सरकारी जमिनीचे खोटे बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमीन हडप करण्याच्या उद्देशाने खोटे दस्त बनवणार्‍या भूमाफिया व भ्रष्ट यांना प्रतिबंध होऊन सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण होण्याबाबत, व खोटे दस्त बनवणार्‍या ग्रामपंचायत पदाधिकारी संबंधित, कर्मचारीविरुद्ध कारवाई होऊन मिळणे, याकरिता दुसरबीड येथील वंजारी समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आज (दि.२३) पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. दुसरबीडमधील गट नंबर ७०६ संदर्भात युवाशक्ती शिक्षण सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेने जमीन मागणी प्रस्ताव सादर केला असल्यास १२ जुलै २०११ चे शासन निर्णयाप्रमाणे सदर प्रस्ताव खारीज करण्यात यावा, व तसेच लेखी मिळावे, तसेच इतर कोणासही सदर गटातील जमीन वाटप करू नये. गटविकास अधिकारी यांनी अधिकार क्षमतेबाहेर जाऊन महसूल जमिनीसंदर्भातील पाहणी करण्याचे अहवाल मागून खोटे दस्तऐवज बनवण्याच्या कृत्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी खोटे दस्त बनवण्यापासून त्यांना परावृत्त करणे अशा प्रकारच्या मागण्यासाठी दुसरबीड येथील वंजारी समाजाच्यावतीने तहसीलदार सिंदखेडराजा व पंचायत समिती सिंदखेडराजा यांच्या कार्यालयासमोर शिवानंद विठोबा सांगळे, सचिन गबाजी घुगे, प्रकाश सांगळे, किसन नामदेव वाघ, ज्ञानेश्वर हिम्मतराव मुंडे, बद्री तुकाराम वाघ, बंडू पुंजाराम सांगळे, परसराम भगवान जायभाये, राजेश पांडुरंग वाघ, अशोक सिताराम सांगळे, मनोहर वाघ, प्रकाश पंढरी घुगे, उद्धव एकनाथ सांगळे, विजय शामराव सांगळे, कारभारी विश्वनाथ सांगळे, गजानन रंगनाथ सांगळे, शिवाजी किसन सांगळे आदी वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!