तुपकरांना ‘डिटेन’ करून जेलमध्ये डांबण्याचा प्लॅन फसला?
– रेल्वे रोको आंदोलनासाठी तुपकरांचे धक्कातंत्र, रेल्वे पोलिसांच्या तोंडात फेस येणार!
– तुपकरांच्या घरी पोलिस बंदोबस्त, राज्यभर शोधाशोध सुरू!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – सोयाबीन, कापसाची दरवाढ, पीकविमा, व शेतीपिकांच्या नुकसान भरपाईबाबत आज (दि.१८) पर्यंत निर्णय घेण्याची डेडलाईन दिल्यानंतरही राज्य व केंद्र सरकारने याबाबत काहीच हालचाल केली नाही. उलट रेल्वे पोलिसांना पुढे करून शेतकरी नेते रविकांत तुपकरांना नोटीस बजावली व कारवाईचा इशारा दिला. रेल्वे पोलिसांच्या या कारवाईला न जुमानता तुपकर रेल्वे रोको आंदोलनावर ठाम राहिल्याने, काल रात्रीच तुपकरांना डिटेन करून जेलमध्ये डांबण्याचा प्लॅन सरकारने पोलिस अधिकार्यांच्या मदतीने बनविला असावा, अशी कुणकुण अतिशय हुशार व चाणाक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना लागल्याने, ते काल रात्रीच भूमिगत झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तोंडाला चांगलाच फेस आला असून, तुपकरांची कसून शोधाशोध सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. रात्री गुप्तचर पोलिस तर सकाळी पोलिसांनी तुपकरांच्या घराभोवती पहारा वाढविला होता. मलकापूर येथे रेल्वेरोको आंदोलनासाठी तुपकर हे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता पाहाता, पोलिस, रेल्वे पोलिस व प्रशासन कमालीची सावधगिरी बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सोयाबीन व कापसाला दरवाढ द्यावी, पीकविम्याची रक्कम देण्यात यावी, तसेच पीक नुकसानीची भरपाई विनाविलंब देण्यात यावी, या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मिसाळवाडी (ता. चिखली) येथील जाहीर सभेतून राज्य व केंद्र सरकारला १८ जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. परंतु, या प्रश्नी तुपकरांशी चर्चा करण्याचे सौजन्यदेखील राज्य सरकारने दाखवले नाही. उलट त्यांच्याहाती लोहमार्ग पोलिसांची नोटीस टेकवून त्यांना मलकापूर येथे रेल्वे रोको आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. ही नोटीस दिल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी तुपकरांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरू केली होती, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. तरीदेखील पोलिस व रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तुपकर हे भूमिगत झाले आहेत. वरिष्ठ सूत्रांच्या खासगीतील माहितीनुसार, काल रात्रीच तुपकरांना डिटेन करून जेलमध्ये डांबण्याचा सरकारचा प्लॅन असावा. कारण, तुपकरांच्या गावखेड्यातील सभांना जोरदार प्रतिसाद मिळत असून, तुपकरांची लाट तर निर्माण झालीच, पण तुपकरांनीही सरकारवर टिकेचा जोरदार सूर पकडला होता. त्यातच तुपकरांनी रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तुपकर हे सरकारच्या टप्प्यात आले होते. तुपकरांवरील अशा प्रकारच्या हिंसक आंदोलनाची जंत्री बाहेर काढण्यात आली असून, बुलढाण्यातील अशाच एका आंदोलनात तुपकर हे जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे तुपकरांना ताब्यात घेऊन त्यांच्या रेल्वे रोको आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था, रेल्वेंच्या अवागमनास निर्माण होणारा अडथळा आणि रेल्वेचे होणारे आर्थिक व मालमत्तेचे संभाव्य नुकसान, तसेच आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता, आदी तांत्रिक मुद्द्यांवर तुपकरांना जेलमध्ये डांबण्यास सरकारला सोपे गेले असते. सरकारच्या या संभाव्य कृतीची रविकांत तुपकरांना कालच कुणकुण लागली होती. त्यामुळे ते रात्रीच भूमिगत झाले असून, आता त्यांना शोधण्यासाठी पोलिस व गुप्तचर यंत्रणेची राज्यभर धावाधाव सुरू आहे. काल रात्री साडेबारा वाजता त्यांनी त्यांचे सर्व मोबाईल बंद केल्याने तुपकरांचा ठावठिकाणा शोधून काढणे पोलिसांना अवघड जात आहे, त्यामुळे पोलिसांच्या चांगलाच नाकात दम आला आहे.
बुलढाण्यातील आत्मदहन आंदोलनावेळी रविकांत तुपकर हे पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी अचानक अंगावर डिझेल ओतून घेत, आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. आतादेखील ते अचानक कोणत्याही वेशात मलकापूर रेल्वे स्थानकावर येण्याची शक्यता पाहाता, व आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता पाहाता, जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अॅलर्ट करण्यात आली असून, मलकापूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच, उद्या (दि.१९) लोहमार्ग पोलिस हे या रेल्वे स्थानकाला अक्षरशः वेढा घालून रविकांत तुपकरांचे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तुपकरांचे कार्यकर्ते, जिल्हाभरातून आंदोलनासाठी येणारे शेतकरी यांच्यात व लोहमार्ग पोलिसांत चकमक होण्याची शक्यता पाहाता, जिल्हा पोलिस दलाच्यावतीनेदेखील मलकापूरकडे अतिरिक्त कुमक पाठवली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे उद्या रविकांत तुपकर हे काय करणार, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.
अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापणा व मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आंदोलन या दोन मोठ्या घडामोडींमुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या रेल्वे रोको आंदोलनाकडे मेनस्ट्रीम मीडियाचे दुर्लक्ष होईल, त्यामुळे तुपकरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी जेलमध्ये केली तरी, त्याचा फारसा वाजागाजा होणार नाही, असा सरकारमधील एका घटकाचा अंदाज आहे. त्यामुळे मलकापूर येथील आंदोलनाची घोषणा करून शेतकरी नेते रविवâांत तुपकर हे चांगलेच सरकारच्या सापळ्यात सापडलेले आहेत. एकीकडे जोर पकडलेल्या त्यांच्या घणाघाती सभांना ब्रेक लागणार आहे, तसेच पुढील काही दिवस इतर मुद्द्यांवर मीडियाचा फोकस राहणार असल्याने तुपकरांचा बंदोबस्त करणे सरकारला सोपे जाणार आहे, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केली आहे.
——————–