शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक; आजची रात्र पोलिस कोठडीत!
तुपकरांना पुन्हा बुलढाण्यात हलविणार!
तुपकरांच्या अटकेनंतर बुलढाणा पोलिस प्रचंड गोंधळलेले असून, मेहकर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर तुपकरांच्या शेकडो समर्थकांनी पोलिस ठाण्यावर धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अॅड. शर्वरीताई तुपकर यादेखील पोलिस ठाण्यात पोहोचल्या होत्या. दरम्यान, यावेळी संतप्त कार्यकर्त्यांकडून ‘पन्नास खोके, एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्यात. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिस प्रशासनाने आजची रात्र तुपकरांना बुलढाणा पोलिस ठाण्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे रात्री तुपकरांना पुन्हा मेहकरातून बुलढाण्यात आणले जाणार आहे.
– जिल्हाभर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, शेतकरीहितासाठी आंदोलनाची हाक देणे गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल जिल्हावासीय करत आहेत. तर मेहकर-चिखली महामार्गासह बहुतांश ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्त्यांवर उतरत सरकारचा निषेध चालविला होता. तुपकरांना अटक केली गेली असली तरी, तुपकरांच्या नेतृत्वातील कडवट नेत्यांची दुसरी फळी आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे.
– चिखली चौफुलीवर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचा ताफा अडविल्याने चिखली चौफुलीवर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी चिखली पोलिसांची कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. हे कार्यकर्तेदेखील पोलिसांच्या मागोमाग मेहकरात पोहोचले होते.
रात्रीच मेहकर पोलिस ठाण्यात हलविले, जिल्हाभरात संतप्त आंदोलने सुरू!
तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ मेहकर-चिखली हायवेवर रास्तारोको
– अटक करून शेतकर्यांचा आवाज दाबता येणार नाही, लढाई सुरूच राहील, आंदोलन होणारच – रविकांत तुपकर
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन कापूस प्रश्नावर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणार्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. सदरचे आंदोलन दडपण्याच्या हेतूने बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच रात्री अटक केली आहे. तुपकर काल रात्रीपासून भूमिगत होते. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त होता, तर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान गाडी बदलून मलकापूरकडे जात असतांना राजूर घाटात पाठलाग करून पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले व तेथून त्यांना बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रात्रीच मेहकर पोलिस ठाण्यात हलविण्यात आले होते. कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या (दि.१९) न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे. तुपकरांच्या जवळच्याच माणसाकडून पोलिसांना सुगावा लागल्याची खात्रीशीर माहिती असून, यापुढे असे आंदोलन करताना तुपकरांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. दरम्यान, तुपकरांच्या अटकेनंतर जिल्हाभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, त्याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. ठीकठिकाणी टायर जाळून सरकारचा निषेध केला जात असून, रस्तारोकोही केला जात होता. हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, तुपकरांना अटक करून जेलमध्ये डांबले जाणार असल्याचे वृत्त सकाळीच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केले होते. उद्या तुपकरांना जामीन मिळाला नाही तर त्यांची रवानगी सरळ जेलमध्ये होणार आहे.
सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई यासह शेतकर्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी ऑक्टोबर महिन्यापासून लढा उभारला आहे. एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग, नागपूर अधिवेशनावरील हल्लाबोल आंदोलन आदी आंदोलनाच्या माध्यमाने राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या. परंतु त्याउपरही सत्ताधारी शेतकर्यांच्या मागण्याबाबत काहीच बोलायला तयार नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १९ जानेवारीरोजी रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली, गुजरातकडे जाणार्या गाड्या अडवून सरकारला शेतकर्यांची ताकद दाखवून देऊ, असा गंभीर इशारा रविकांत तुपकरांनी दिलेला होता. त्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी १६ जानेवारीरोजी तर बुलढाणा शहर पोलिसांनी १८ जानेवारीरोजी रविकांत तुपकर नोटीस बजावली होती. शिवाय, रविकांत तुपकर यांच्या घराला पोलिसांनी अक्षरशः वेढा घातला होता. रविकांत तुपकर सध्या जिल्हाभर एल्गार परिवर्तन मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १७ जानेवारीरोजी या परिवर्तन मेळाव्यासाठी ते सिंदखेडराजा तालुक्यामध्ये होते. सिंदखेडराजा तालुक्यातील मेळावा आटोपल्यानंतर रविकांत तुपकर हे रेल्वे रोको आंदोलनाच्या अनुषंगाने भूमिगत झाले होते. काल रात्रीपासून ते भूमिगत असल्याने पोलिसांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली होती. त्यांच्या घराभोवती तगडा बंदोबस्त तर होताच, शिवाय बुलढाणाकडे येणार्या आणि मलकापूरकडे जाणार्या गाड्यांवर पोलिसांनी करडी नजर होती. दरम्यान, सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान रविकांत तुपकर हे गाडी बदलून पोलिसांना चकमा देत मलकापूरच्या दिशेने निघाले असता, बुलढाणा ते मलकापूर मार्गावर राजूर घाटात पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडून रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले, आणि अटक करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना अचानक मेहकर पोलिस ठाण्यात हलविण्यात आले. तुपकरांच्या या हालचालीची खबर त्यांच्याच जवळच्या कुणीतरी लीक केली असल्याची माहिती प्राप्त होत आहे. त्यामुळे तुपकरांना मोठा धक्का मानला जात आहे. तुपकरांच्या अटकेची वार्ता कळताच कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर गर्दी करायला सुरुवात केली आहे. आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा डाव असून, पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकर्यांचा आवाज दाबत आहे, असा आरोप तुपकरांनी केला आहे.
तुपकरांची आजची रात्र पोलीस ठाण्यातच; उद्या कोर्टात हजर करणार!
दरम्यान, रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आले असून, त्यांचा आजच्या रात्रीचा मुक्काम हा पोलीस ठाण्यातच राहणार आहे. पोलीस कोठडीमध्ये सध्या ते असून, उद्या (दि.९) सकाळी त्यांना न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे. रात्री तुपकरांना बुलढाण्यातून मेहकर पोलिस ठाण्यात हलविण्यात आले होते.
शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : रविकांत तुपकर
मला अटक केल्याने आंदोलन थांबणार नाही…आंदोलन होणारच… pic.twitter.com/4XKybS4iN4
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) January 18, 2024
सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई मागणे हा गुन्हा आहे का? शेतकर्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा असेल तर असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, ही भूमिका यापूर्वीच मी जाहीर केलेली आहे, असे रविकांत तुपकर यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. पोलिसांच्या माध्यमातून शेतकर्यांचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. शिवाय, आता लोकसभा तोंडावर आहेत आणि मी शेतकर्यांच्या आग्रहास्तव लोकसभेची उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही पुढार्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोणते ना कोणते कारण पुढे करून, तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार असे सांगून, मला किमान वर्षभर जेलमध्ये डांबून ठेवण्याचा सत्ताधार्यांचा डाव आहे. परंतु काहीही झाले तरी मी घाबरणार नाही, शेतकर्यांसाठीचा हा लढा असाच सुरू राहणार आहे, मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे तुपकरांनी ठणकावून सांगितले.