बिबी (ऋषी दंदाले) – श्रीक्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारीरोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठापणा होणार असल्याने, या दिवशी बिबी गावातील मांसविक्री व देशीविदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयाला मुस्लीम बांधवांसह सर्वांनी आपला पाठिंबा दर्शविलेला आहे.
ग्रामपंचायत सरपंच मातोश्री चंदाबाई गुलमोहर, भास्कर खुळे उपसरपंच, फुपाटे ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्यांसह ठराव घेऊन श्रीराम उत्सव घरोघरी श्रीराम ज्योती लावून साजरा करण्याचे आयोजनदेखील करण्यात आलेले आहे. संपूर्ण देशातील जनतेने पाहिलेले भव्य राम मंदिराचे स्वप्न २२ जानेवारीरोजी साकार होत असून, अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वच भाविक भक्त तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब अयोध्या पोहोचू शकत नसल्यामुळे गावातच हा उत्सव सण म्हणून साजरा केला जाणार आहे. बिबी ग्रामपंचायतीने ‘मेरी बिबी मेरी अयोध्या’ समजून गाव रस्त्याची स्वच्छता केली आहे. परिसर स्वच्छ राहावा याची काळजी घेतली जात आहे.
बिबी गावात भक्तीमय वातावरण नांदावे, गावात प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील तसेच गावठाण परिसरातील मटण, मास, मच्छी विक्री दुकाने, तसेच चायनीज दुकाने व देशीविदेशी मद्य दारूविक्री दुकाने, बार, धाबे, मांसाहारी हॉटेल्स, अवैद्य धंदे २२ जानेवारीरोजी श्रीराम उत्सवानिमित्त एक दिवस बंद ठेवण्याचा ठराव बिबी ग्रामपंचायतीने सर्वानुमते घेतला आहे. या निर्णयाला सर्व ग्रामस्थांनी संमती दर्शवली असून, श्रीराम उत्सवाला सहकार्य करण्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. परिसरातून बिबी ग्रामपंचायतीने घेतलेल्या अनोख्या संकल्पनेचे कौतुक परिसरातून होत आहे.
———–