सरकार ‘हिटलरशाही’वर उतरले; शेतकर्यांचे आंदोलन चिरडले!
पोलिसांकडून दोन शेतकर्यांना बेदम मारहाण
लोकशाही मार्गाने सरकारविरोधात निषेध आंदोलन करणार्या दोन शेतकर्यांना पोलिसांनी चांगलीच मारहाण केली आहे. या शिवाय, गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात येत असतानाही काही शेतकर्यांना मारहाण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पोलिसांच्या या मारहाणीबद्दल शेतकर्यांतून संतापाची तीव्र लाट निर्माण झाली असून, याबाबत कोर्टात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
– सोयाबीन, कापसाला भाव मागणार्या शेतकर्यांना सरकारची जुलूमी वागणूक!
– हा तर आंदोलन दडपण्याचा प्रकार – शर्वरीताई तुपकर
मलकापूर, जि. (बुलढाणा) – राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सोयाबीन व कापसाला भाव मागणार्या शेतकर्यांवर आपली हिटलरशाही चालवली आहे. काल संध्याकाळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बेकायदेशीरपणे अटक केल्यानंतर, आज मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनास गेलेल्या अॅड. शर्वरीताई तुपकर व शेतकर्यांना रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन हे आंदोलन अक्षरशः चिरडले आहे. दरम्यान, आज दुपारपर्यंत रविकांत तुपकर यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार असून, त्यांना जामीन मिळतो की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर गनिमी कावाने त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्या नेतृत्वात आज सकाळीच शेकडो शेतकरी मलकापूर रेल्वे स्थानकावर धडकले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे रोखण्यासाठी असंख्य शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्याने पोलिसांचादेखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकर्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. तसेच याचवेळी रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनादेखील ताब्यात घेण्यात आले होते. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. रविकांत तुपकर यांच्यापश्च्यात किल्ला लढविणार्या शर्वरीताईंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी रेल्वे स्थानकाला अक्षरशः गराडा घातला होता. जिल्ह्यातही या घटनेचे हिंसक पडसाद उमटायला सुरूवात झाली होती.
सोयाबीन, कपाशीला दरवाढ, पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई यांसह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी दि. १९ जानेवारीरोजी मुंबई-दिल्लीकडे जाणार्या रेल्वे रोखू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मिसाळवाडी (ता.चिखली) येथील जाहीर सभेतून दिला होता. त्यामुळे आंदोलनाच्या एक दिवस आधीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर आजचे आंदोलन होणार की नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, आज सकाळीच रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅड. शर्वरीताई तुपकर या गनिमीकाव्याने मलकापूर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. तत्पूर्वीच शेकडो शेतकर्यांनी रेल्वे स्थानकाला वेढा घातला होता. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी तेथे तैनात असलेल्या पोलिसांकडून अॅड. शर्वरीताई तुपकर यांच्यासह शेकडो शेतकर्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
सरकार थोबाडावर आपटले! रविकांत तुपकरांची न्यायालयाकडून सुटका!!