Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

सरकार थोबाडावर आपटले! रविकांत तुपकरांची न्यायालयाकडून सुटका!!

– शेतकरी नेते रविकांत तुपकरांची अटक बेकायदेशीर ठरवत जिल्हा न्यायालयाने केली सुटका

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सोयाबीन, कपाशीला भाववाढ मागणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी केलेली अटक जिल्हा न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली असून, त्यांची सुटका करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागून तुपकरांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न करणारे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार न्यायालयात चांगलेच थोबाडावर पडले आहे. न्यायालयातून सुटका होताच, तुपकर यांनी ‘अब रोक सके तो रोक लो’ या नंतरचे आंदोलन सरकार हदरविणारे असणार, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

सोयाबीन-कापूसप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देताच, बुलढाणा पोलिसांनी काल संध्याकाळी तुपकरांना राजूर घाटातून त्यांची गाडी अडवून बळजबरीने बेकायदेशीरपणे अटक केली होती. मध्यरात्रीपर्यंत तुपकरांची बुलढाणा व मेहकर पोलिस ठाणे अशी वारी केली. मेहकरमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालताच, तणाव निर्माण झाला होता. त्या पृष्ठभूमीवर पोलिसांनी पुन्हा तुपकरांना बुलढाण्यात आणले. दुपारच्या सुमारास तुपकरांना न्यायालयापुढे हजर केले असता, पोलिसांनी १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली. परंतु, न्यायालयाने तुपकरांची अटकच बेकायदेशीर ठरवत, त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. तुपकर यांची सुटका होऊन बाहेर येताच, शेतकरी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले, की आपणास मिळत असलेला जोरदार प्रतिसाद पाहाता, अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोलिसांकडून बेकायदेशीर अटक करण्याचे कृत्य करण्यात आले. मला अटक करूना मेहकरला का घेवून गेले, याचे उत्तर आता पोलिसांना द्यावे लागले आहे. मलकापूर येथे आज ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले असून, तेथे मलकापूर पोलिसांनी निदर्यीपणे शेतकर्‍यांवर लाठ्याकाठ्या चालविल्या. शेतकर्‍यांवर हात उचलणार्‍या शेतकर्‍यांचा आम्ही तीव्र निषेध करत असून, कारवाईची मागणी करणार आहोत. आता पुढील आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकवणारे असेल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.


सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजीत नाही, या स्वामी विवेकानंदांच्या ओळी उच्चारून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर घणाघाती शब्दांत टीका केली. पोलिसांनी केलेली अटक जोरजबरदस्ती होती. कितीही पोलिस केसेस झाल्या तरी आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकर्‍यांसाठी लढत राहू. सोयाबीन व कापूस प्रश्नांसह शेतकरी हितासाठी आता पुढचे आंदोलन सरकार हादरवणारे असेल. पोलिस कुणाच्या इशार्‍यावर काम करत आहेत, मला मेहकर पोलिस स्टेशनला का नेले, असा सवालही तुपकरांनी उपस्थित केला. लवकरच शेतकरी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, पुढील आंदोलनाची रणनीती आखणार आहोत, असेही तुपकरांनी ठणकावले आहे. यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले.

सरकार ‘हिटलरशाही’वर उतरले; शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!