– केंद्राकडून हाफ डे, तर राज्याकडून फुल्ल डे सुट्टी जाहीर झाल्याने कर्मचार्यांत आनंद!
मुंबई (प्रतिनिधी) – अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन अन् रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशातील रामभक्तांचे डोळे लागलेत. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवशी केंद्राने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनेदेखील केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत २२ जानेवारीरोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात आत्तापासूनच या सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ही प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने देशभरातील हजारो दिग्गजांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. तसेच मंदिर ट्रस्ट या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणार आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक दृकश्राव्य माध्यमातून हा सोहळा पाहू शकतील. दरम्यान, मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांसाठी २२ जानेवारी रोजी हाफ डे घोषित केला होता. त्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारनेही सुटी जाहीर करत कर्मचार्यांना हा सोहळा अनुभवण्याची संधी दिली आहे. राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्याआधी उत्तरप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड सरकारने २२ जानेवारीरोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
सहा दिवस बँका बंद
हजरत मोहम्मद अली यांच्या जयंतीनिमित्त २५ जानेवारी रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशीदेखील बँका बंद असतील. २७ जानेवारीरोजी या महिन्यातला चौथा शनिवार असल्याने याही दिवशी बँका बंद असणार आहेत. २१ आणि २८ जानेवारीरोजी रविवार आहे. तर २२ जानेवारी रोजी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याचाच अर्थ २१ जानेवारी ते २८ जानेवारी या आठ दिवसांपैकी केवळ दोनच दिवस (२३ व २४ जानेवारी) बँका सुरू असतील.
दहावीची सराव परीक्षा एक दिवसाने पुढे ढकलली!
दहावीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरु आहेत. सोमवारीही पेपर होता. पण श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वाजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने हा पेपरही एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था व केंद्रीय औद्योगिक संस्था व कार्यालयांत दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसाची सुट्टी असेल.
———-