LONARMEHAKARVidharbha

शेतकरी आत्महत्या करत असताना हे कोंडगे सरकार त्याच्या मरणाचा तमाशा बघत आहे – रविकांत तुपकर

बिबी (ऋषी दंदाले) – सध्या शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. सत्ताधारी मात्र बघ्याची भूमिका घेऊन कोडगेपणाने शेतकर्‍यांच्या हालअपेष्टांचा तमाशा बघत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मनामध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून, येणार्‍या काळात राजकीय परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी येथे काल झालेल्या ‘एल्गार परिवर्तन मेळाव्या’ला शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावकर्‍यांनी रविकांत तुपकरांचे अतिशय उत्साहात व जोरदार स्वागत केले.

परिसरातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक तरुण आणि महिलांची या मेळाव्याला मोठी गर्दी दिसून आली. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, सोयाबीन-कापसाला भाव नाही. यावर्षीची नुकसान भरपाई, पीकविमा मिळाला नाही. दुष्काळाची मदत मिळाली नाही. तरी सत्तेतील एकही खासदार-आमदार याबाबत बोलतांना दिसून येत नाही. सत्तेतील कोणत्याही नेत्याला शेतकर्‍यांबाबत खरी तळमळ राहिली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी या मेळाव्याला दिलेला प्रतिसाद हा सरकारविरुद्ध रोष व्यक्त करणारा आहे. परिवर्तनाच्या दिशेने शेतकर्‍यांचा यावेळी ओढा आहे. त्यामुळे येणार्‍या काळात राजकीय परिवर्तन अटळ आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या प्रश्नांसाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. वेळप्रसंगी जीवाची परवा न करता आक्रमक आंदोलने केली आहेत. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या पदरात काही ना काही पाडून देण्यात आपण प्रत्येक वेळी यशस्वी ठरलो. त्यामुळे शेतकर्‍यांनी ठीकठिकाणी केलेला सत्कार मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणार असल्याचेदेखील रविकांत तुपकर यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले, विलास बचाटे, अनिल बोरकर, विनायक सरनाईक, नितीन राजपूत, सुरेश ढोणे, गणेश गारोळे, देवेंद्र आखाडे, कैलास उतपुरे, वैभव आखाडे, मोहम्मद मक्सुद बागवान, जुबेर भाई, अरुण मुधळकर, प्रफुल्ल देशमुख, सर्जेरावबाप्पू देशमुख, शरद शेवाळे, अरविंद दांदडे, संदिप नालींदे, बाळुभाऊ देवकर, गणेश कष्टे, अनिस भाई, गोपाल डोंबळे, जावेद खासाब, गजानन कुटे, दशरथ बोरे, गोपाल मंजूळकर, अशोक गाडेकर, गजानन घुबे, ऋषी भोपळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर गावकर्‍यांनी या मेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!