लोकसभेच्या मैदानातून डॉ. शिंगणे बाहेर; श्वेताताई महाले व रविकांत तुपकरांतच लढतीची राजकीय चिन्हे!
– तब्बल एक लाखाच्या फरकाने रविकांत तुपकर विजयी होतील? : गुप्तचर सूत्र
– श्वेताताई मैदानात उतरल्या तर मात्र राजकीय चित्र पालटणार – वरिष्ठ नेत्यांचा विश्वास
बुलढाणा/मुंबई (खास प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाने ४८ पैकी १२ जागा मागितल्या असल्या तरी त्यांना केवळ सहाच जागा दिल्या जातील, असे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, अजितदादा गटाने बुलढाणा लोकसभा मतदारसंघ वगळून जागा मागितल्या असून, कालच्या (दि.१५) मेरा बुद्रूक येथील जाहीर सभेत बोलतानादेखील माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपण लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बुलढाण्याची जागा महायुतीत भाजपकडे जाणार असल्याचे सुनिश्चित मानले जात असून, येथून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना भाजपकडून कोण फाईट देणार याबाबत चित्र स्पष्ट नसले तरी, भाजपच्या नेत्या तथा चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नावाची शक्यता पुढे आली आहे. सद्या तुपकरांसाठी एकतर्फी झालेली लोकसभेची लढत श्वेताताई मैदानात उतरल्या तर मात्र चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. आता हाती आलेल्या गोपनीय माहितीनुसार, या निवडणुकीत रविकांत तुपकर यांना किमान एक लाखाचा लीड मिळण्याची शक्यता असून, श्वेताताईंना उमेदवारी मिळाल्यास मात्र तुपकरांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाचे जवळपास निश्चित झाले आहे. तथापि, बुलढाण्याच्या जागेबाबत संदिग्धता आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे चिखलीच्या आमदार तथा पक्षाच्या कर्तव्यदक्ष तथा आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांच्या नावाचा अग्रक्रमाने विचार होऊ शकतो. परंतु, या जागेवर शिंदे गट आपला दावा सांगत असून, विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना लढण्याची इच्छा कायम आहे. तथापि, भाजपच्या खासगी सर्वेक्षणात मात्र प्रतापराव निवडून येण्याची शक्यता कमी वर्तविली गेली आहे. बुलढाण्याचे जनमत सद्या प्रतापरावांच्या विरोधात गेलेले दिसत आहे. त्यामुळे पूर्वी भाजपचाच असलेला हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे परत घेण्यासाठी भाजप इच्छूक असून, त्यामुळेच या मतदारसंघाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय विश्वासू केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत, भाजपची कोर कमिटी, बूथ रचना, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी नियोजनात्मक रणनीती आखली आहे. विशेष म्हणजे, यादव यांच्या प्रत्येक दौर्यात श्वेताताई महाले या आवर्जुन उपस्थित होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना रोखण्यासाठी श्वेताताई महाले या भाजपच्या उमेदवार राहू शकतात, असा एक राजकीय सूर आहे. जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदारसंघापैकी भाजपचे खामगाव, चिखली व जळगाव जामोद मतदारसंघात आमदार आहेत, शिंदे गटाचे बुलढाणा व मेहकरमध्ये आमदार आहेत. तर सिंदखेडराजा मतदारसंघात अजितदादा पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत. जो उमेदवार मिळेल, त्याचे प्रामाणिकपणे काम करून लीड द्यायचा आहे, असे महायुतीत निश्चित झालेले आहे. त्यामुळे डॉ. शिंगणे यांना जरी रविकांत तुपकरांचे काम करण्याची इच्छा असली तरी, त्यांना आतून व बाहेरून उमेदवारी जाहीर झाल्यास श्वेताताई महाले यांचेच काम करावे लागेल. सर्वांच्या मतदारसंघातून मिळणार्या लीडचे राजकीय मोजमाप निश्चितच होणार आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने विविध राजकीय नेतृत्वाशी चर्चा करून ‘त्या सोर्स’द्वारे हे वृत्त दिले असले तरी, या वृत्ताबाबत आज चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संपर्क साधत, नाराजी व्यक्त केलेली आहे. ‘सद्या तरी असा कोणताही विचार नसून, विनाकारण राजकीय शत्रूत्व निर्माण करण्यात अर्थ नाही’, असे कळवले आहे. त्यामुळे हे वृत्त शक्यतेवर आधारित संभाव्य राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने वाचले जावे, अशी संपादकांची भूमिका आहे.
लोकसभा निवडणुकीच्या २०१९ व २०२४ च्या लढतीत जमीन-अस्मानचा फरक आहे. पूर्वी एकत्र असलेली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली असून, शिवसेनेच्या शिंदे गटाविरोधात जिल्ह्यातील जनमत गेलेले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याभोवती घुटमळलेला आहे. डॉ. शिंगणे हे अजितदादा पवारांसोबत असल्याने मूळ शरद पवार गटाचे अस्तित्व तसे नगण्य आहे. २०१९च्या निवडणुकीत पक्ष ज्या बुलढाण्यासह सात जागांवर दुसर्या क्रमांकावर होता, त्या जागा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या आहेत. या निवडणुकीत बुलढाण्यात प्रतापराव जाधव (शिवसेना) यांनी ४६.८८ टक्के मते म्हणजे ५ लाख २० हजार ५३७ मते मिळवली होती, अर्थात यात बहुतांश मते भाजप व ठाकरेंच्या शिवसेनेची होती. डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी ३४.९७ टक्के म्हणजेच ३ लाख ८८ हजार २९३ मते मिळवली होती, अर्थात यात काँग्रेसच्या मतांचा सिंहाचा वाटा होता. तसेच, शेतकरी नेते रविकांत तुपकर हेच डॉ. शिंगणे यांचे या निवडणुकीत स्टार प्रचारक होते. तर बहुजन वंचित आघाडीने बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी देऊन १५.५२ टक्के म्हणजेच १ लाख ७२ हजार ३०६ मते घेतली होती. वंचितच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे बुलढाण्याची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे मागत आहेत, अशी माहिती आहे. तर ठाकरेंकडेदेखील संभावतः शक्य अशा रविकांत तुपकर, श्वेताताई महाले यांना तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा सद्या तरी उमेदवार दिसत नाही.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परवा दिवशी चिखलीत येऊन गेले. त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर स्पष्टपणे दावा न सांगता, महायुती देईल तो उमेदवार निवडून आणावा लागेल, असे सांगून प्रतापराव जाधवांच्या इराद्यावर पाणी फेरले होते. त्यामुळे यावेळेस प्रतापरावांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करून श्वेताताई महाले यांची उमेदवारी नजीकच्या काळात जाहीर होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सद्या शेतकरी नेते रविकांत तुपकर हे घाटावर खेड्यापाड्यांत जोरदार सभा घेत आहेत. मिसाळवाडी (ता.चिखली) येथील विराट सभेतून त्यांनी लोकसभेचा नारळ फोडलेला आहे. तेथूनच त्यांनी पुन्हा एकदा सोयाबीन-कापूस आंदोलनाची घोषणा केली होती. निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक आंदोलन करून वेळप्रसंगी जेलमध्ये जाऊन बसण्याची व जोरदार लाट निर्माण करण्याची त्यांची राजकीय रणनीती दिसते आहे. परंतु, “तुपकरांच्या गावखेड्यातील सभा या केवळ हवेचा बुडबुडा असून, त्यांना एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घ्यावा लागेल किंवा उद्या भाजपने उमेदवारी दिल्यास श्वेताताई महाले यांच्यासारख्या प्रबळ उमेदवारासमोर ते टिकणार नाहीत, असेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोकं काय राज ठाकरेंच्या सभेलाही गर्दी करतात, परंतु त्यांना मते देत नाहीत, तसे तुपकरांचे होईल, असेही राजकीयतज्ज्ञांचे मत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भातील भाजपच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे हे संपूर्ण विदर्भ लवकरच पिंजून काढणार असून, नरेंद्र मोदी यांच्या जास्तीत जास्त सभा लावल्या जाणार आहेत. तसेच, त्यापूर्वी कापूस, सोयाबीन, पीकविमा, पीक नुकसानभरपाई आदी प्रश्नदेखील मार्गी लावले जाणार आहेत. त्यामुळे भाजपने बुलढाण्याची जागा घेतलीच तर भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांनादेखील वाटतो आहे.